कोट्यवधी हिंदूंना प्रतीक्षा होती तो क्षण आला! उद्धव ठाकरे यांचे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचा श्रीगणेशा 5 ऑगस्ट रोजी होत आहे. जगभरातील कोट्यवधी हिंदूंना याच ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा होती, अशा भावना व्यक्त करणारे पत्र शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमी ट्रस्टला पाठवले असून या पत्रात त्यांनी रामजन्मभूमीचा लढा आणि त्यातील शिवसेनेचा सहभाग या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राममंदिराच्या सोहळ्याबद्दल अपार आनंद व्यक्त करत माझीही प्रभू श्रीरामावर अपार श्रद्धा आहे, असे म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर हजारो शिवसैनिकांनी अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली आहे. त्या आंदोलनात शिवसेनाच अग्रभागी होती आणि देशभरातील सर्वच वर्तमानपत्रांनी शिवसेनेच्या सहभागाची दखलही घेतली होती. त्या सर्व बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्याकडे सुपूर्द केला.

एक कोटीची देणगी जमा

‘बिनु सेवा जो द्रवै दीन पर राम सरिस कोउ नाही’ हा संत तुलसीदास यांचा दोहा उद्धृत करून उद्धव ठाकरे पत्रात म्हणतात, ‘राम-काज’ हेतूने मी जेव्हा अयोध्या दौरा केला होता तेव्हा राममंदिर उभारणीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने 1 कोटी रुपयांची देणगी देण्याचा संकल्प मी केला होता. ही रक्कम श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खाते क्रमांक 39161495808 (स्टेट बँक ऑफ इंडिया, अयोध्या – 2510 शाखा) येथे 27 जुलै 2020 रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून जमा केली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावरील पवित्र माती अयोध्येला रवाना

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एकच ध्यास होता… अयोध्येत राममंदिर झालेच पाहिजे! शिवसेनाप्रमुखांचा तो ध्यास, ते स्वप्न पूर्ण होत असताना त्यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाची पवित्र मातीही ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.