
बेफाम कोसळणारा पाऊस आणि सोबतीला बेभान झालेला वारा… गेल्या तीन दिवसांत मुंबईत पावसाने असे काहूर माजवले आहे. तब्बल एक महिन्याचा पाऊस या तीन दिवसांत कोसळला. कुठे भिंत-रस्ता खचला, झाडे कोसळली, झोपडपट्टीतील घरांची कौले आणि टोलेजंग इमारतींच्या गच्चीवरील पत्रे उडाले. ‘26 जुलै’ची आठवण ताजी झाली खरी; पण असा भयाण पाऊस कधी पाहिला नव्हता, असे वयोवृद्ध नागरिक सांगतात.
मुंबईत दरवर्षी सरासरी 2480 मिमी पावसाची नोंद होते. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास मुंबईत ऑगस्ट महिन्यात कुलाबा येथे 437.4 मिमी तर सांताक्रुझ येथे 509.7 मिमी पावसाची नोंद होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्य़ा पावसाने 3 ऑगस्टपासून जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. 3 ते 5 ऑगस्ट या तीन दिवसांत कुलाबा येथे 637.2 तर सांताक्रुझ येथे 515.2 इतका रेकॉर्डब्रेक पाऊस नोंदवला गेला. विशेष म्हणजे, दहा वर्षांच्या सरासरीनुसार संपूर्ण ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस तीन दिवसांतच कोसळला असून या पावसानेदेखील विक्रमी नोंद केली आहे. यामध्ये ऑगस्टमधील सरासरीच्या तुलनेत कुलाबा येथे ऑगस्टमध्ये 200 मिमी जादा पावसाची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत दरवर्षी एकूण नोंदवल्या जाणाऱ्य़ा 2480 मिमी पावसापैकी कुलाबा येथे 2404.0 तर सांताक्रुझ येथे 2416.2 मिमी पावसाची नोंद होते.
ऑगस्ट महिना अतिवृष्टीचा
मुंबईत गेल्या दहा वर्षांत मुंबईत ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होत असून कुलाबा येथे सरासरी 437.4 तर सांताक्रुझ येथे 509.7 मिमी पावसाची नोंद होत आहे. यामध्येही काही वेळा वाढ होत असून 2017 मध्ये कुलाबा येथे 645.8 तर सांताक्रुझ येथे 937.5 मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट 2010 मध्ये कुलाबा येथे 882.4 मिमी, तर सांताक्रुझ येथे 1040.8 मिमी पावसाची नोंद झाली. तर 2011 ला कुलाबा 704.2 आणि सांताक्रुझ येथे 791.7 पावसाची नोंद झाली होती.
कुलाब्यात 22 वर्षांचा रेकॉर्ड 12 तासांत मोडला
कुलाबा येथे बुधवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या 12 तासांत तब्बल 293 मिमी पावसाची नोंद झाल्याचे ‘आयएमडी’चे उपमहासंचालक के. एस. होशाळीकर यांनी सांगितले. ऑगस्ट 1998 मध्ये 24 तासांत 261.9 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली होती. मात्र 24 तासांचा रेकॉर्ड केवळ 12 तासांतच मोडला गेल्याचे होशाळीकर यांनी सांगितले. 2005च्या अतिवृष्टीत सांताक्रुझमध्ये 24 तासांत 944 मिमी पावसाची नोंद झाली असताना कुलाबा येथे फक्त 161 मिमी पावसाची नोंद झाली होती.
प्रशासनाने सतर्क राहून मदतकार्य करावे : मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, कोकण तसेच कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्हाधिकारी तसेच नियंत्रण कक्षांशी बोलून सातत्याने घेत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री आणि आज सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याशीही बोलले व सूचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून त्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल व कशी तयारी करता येईल याविषयी चर्चा केली. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून 290 प्रवाशांना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्य़ा रेल्वे पोलीस दलाच्या व एनडीआरएफ जवानांचे त्यांनी कौतुक केले. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी येथील परिस्थितीची त्यांनी पुणे विभागीय आयुक्त व कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली व पुर परिस्थिती असल्यास त्या त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवली, रायगड येथे कुंडलिका या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.




























































