सिंधुदुर्गात पुन्हा पावसाचा जोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ तालुक्यासह इतर सर्वच भागात पुन्हा पावसाने जोर धरला असून सोमवारी शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र धुवॉधार पाऊस कोसळला. दिवसभर तालुक्यात सरीवर सरी कोसळत होत्या. सतत मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान खात्याकडून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्यानुसार रविवारी रात्रीपासूनच जिह्याच्या काही भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. या पावसाने कुडाळसह अन्य तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

पूर ओसरल्यावर दोन दिवसांनी जनजीवन पूर्वपदावर आले होते. त्यानंतर गेले चार दिवस अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असतानाच रविवारी सायंकाळपासून संततधार सुरुवात झाली. सोमवारी दिवसभर कुडाळ तालुक्यात सरीवर सरी कोसळत होत्या. या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत होते.