दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष! हायकोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध करून न दिल्याने अनामप्रेम या संस्थेच्या वतीने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेप्रकरणी हायकोर्टाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

दिव्यांग विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नसल्याने त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवणे गरजेचे आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करत अनामप्रेम या संस्थेच्या वतीने ऍड. उदय कारुंजीकर यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावेळी त्यांनी कोर्टाला सांगितले की विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी राज्य सरकारनं नियमावलीही तयार केली. मात्र कर्णबधीर, नेत्रहीन, मुकी, तसेच गतिमंद विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकसंख्येच्या एकूण 7 टक्के जनता ही दिव्यांग म्हणून गणली जाते. ज्यात 3 टक्के गतिमंद मुलांचा समावेश आहे. यातील बरेचसे विद्यार्थी हे गरीब कुटूंबातून येतात. वायद्याने त्यांना शिक्षणासह इतर सर्व विभागांत विशेष सवलत दिलेली आहे. असे असतानाही या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही ही उपाययोजना करण्यात आलेली नाही न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राज्य सरकारने यासंदर्भात उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतला. त्याकर हायकोर्टाने वेळ देत सुनावणी आठवडय़ाभरासाठी तहकूब केली.