शिवमंदिरात दूध अर्पण करण्यावरून भाविक आणि पुजाऱ्यातील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादमधील खडिया शिवमंदिरात श्रावण महिना असल्याने शिवपिंडीवर दूध अर्पण करण्यासाठी गेलेल्या भाविकाचा पुजाऱ्याशी वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर हा वाद खडिया पोलीस ठाण्यात पोहचला असून दोघांनीही परस्परांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही मागे हटायला तयार नसल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे.

अहमदाबादमधील माणेक चौकात राहणारे उद्योगपती राजू शाह (वय 63), पत्नी हेमा (वय 58) आणि तीन वर्षाची नातीसह देवशेरी येथील खडिया शिवमंदिरात आले होते. श्रावण महिना असल्याने शिवपिंडीवर दूध अर्पण करण्यासाठी ते रांगेत उभे होते. शिवपिंडीवर दूध अर्पण करत असतानाच मंदिरातील पुजारी पार्थ भट्ट (31))आपल्याकडे आले आणि शिवलिंगावर थोडे दूध अर्पण करा आणि शिल्लक राहिलेले दूध बाहेर ठेवलेल्या बादलीत जमा करा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर भट्ट यांनी आपल्याला शिवीगाळ केली. आमच्यात वाद होत असलेला बघून भट्ट यांची पत्नी आणि काकू तेथे आल्या. त्यांनीही आपल्याला आणि आपल्या कुंटुबियांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार शाह यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

शाह शिवपिंडीवर अर्पण करत असलेले दूध गर्भगृहात पडत होते. त्यामुळे आपण त्यांना योग्यप्रकारे दूध ओतण्यास सांगितले. तसेच इतर भाविकांनाही दर्शन घ्यायचे असल्याने त्यांनी मार्गात उभे राहू नये, अशी विनंती आपण शाह यांना केली. आपण त्यांना शांततेत सांगत असतानाही शाह आणि त्यांच्या पत्नीने आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर ते दोघे त्यांचा मुलगा आणि काही लोकांना सोबत घेऊन आले आणि आपल्याला पुन्हा मारहाण केल्याचे पुजारी भट्ट यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

शाह यांनी पुजारी भट्ट, त्यांची पत्नी आणि काकू यांच्याविरोधात तर पुजारी भट्ट यांनी शाह, त्यांची पत्नी, मुलगा आणि त्यांच्यासोबत आलेल्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघांमधील वाद मिटवत समेट घडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, दोघेही मागे हटायला तयार नसल्याने अखेर तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.