
देशात आगामी काळात होत असलेल्या निवडणुका लक्षात घेता भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर लवकरच संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. या बदलात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
कोरोना संकटातही बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून भाजपने यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जेडीयू नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढविल्या जाणाऱया या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी देशातील प्रमुख भाजप नेत्यांना बिहारमध्ये पाचारण केले जाणार आहे. या सर्व नियोजनात फडणवीसांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला फडणवीस उपस्थित होते. बिहार निवडणुकीत सुशांतसिंह राजपूत प्रकरण कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता असल्याने, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील भाजप नेत्याकडे निवडणूक प्रभारी पद देण्याचा विचार भाजपकडून केंद्रीय पातळीवर केला जात आहे. विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत ते काम पाहतील, अशी चर्चा आहे.
























































