आत्मनिर्भरता म्हणजे स्वत: सक्षम होणे; जगापासून दूर राहणे नव्हे! स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या आत्मनिर्भरतेचा अर्थ आहे स्वतः सक्षम होणे, जगापासून स्वतःला दूर ठेवणे नव्हे. याचा अर्थ हिंदुस्थानचा जागतिक अर्थव्यवस्थेत सहभाग असणारच आहे, पण हिंदुस्थान आत्मनिर्भरही होणार आहे, असा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिंदुस्थानच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिला आहे.

हिंदुस्थानच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देण्यासारखा आनंद नाही. देशातील युवक स्वतंत्र हिंदुस्थानात राहत असल्याचा विशेष अनुभव  घेत आहेत. या देशासाठी आपले बलिदान देणार्‍या हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशा भावना राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केल्या.

देश कोरोनायोद्धय़ांचा ऋणी

कोरोनासारख्या कठीण परिस्थितीचा सामना करीत ज्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवकांनी रुग्णांची सेवा केली त्यांचा देश ऋणी राहील. त्याचप्रमाणे गलवान खोर्‍यात चीनशी लढताना जे शहीद झाले त्यांना हा देश अभिवादन करतो. या सैनिकांच्या शौर्याने दाखवून दिले की आमची देशाच्या शांततेत आमची आस्था आहे, पण जर कोणी ही शांती भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.