मुंबई अग्निशमन दल ‘हायटेक’ होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

 >> वैभव शिरवडकर

मुंबईची वाढ उभी होऊ लागल्यापासून उंच इमारतींना लागलेली आग ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई अग्निशमन दल हायटेक होणार असून येत्या काळात ड्रोन कॅमेरे, हेलिकॉप्टर्स आणि अत्याधुनिक बाईकचा समावेश अग्निशमन दलाच्या ताफ्यात केला जाणार आहे. मुंबईची सुरक्षा आणि आगामी योजनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल प्रमुखपदाची अतिरिक्त जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या शशिकांत काळे यांच्याशी दैनिक ‘सामना’ने केलेली ही खास बातचित.

अग्निशमन दल उपप्रमुख असताना तुमच्यावर प्रमुख अग्निशमन दल अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी आव्हानात्मक वाटते का?

– गेली 33 वर्षे मी अग्निशमन दलाच्या सेवेत आहे. त्यापैकी 29 वर्षे मुंबई अग्निशमन दलात होतो. 2016 ते 2020 पर्यंत मी ठाणे अग्निशमन दलाचा प्रमुख होतो. अग्निशमन दलात कोणीही, कितीही वर्षे सेवा केली तरी प्रत्येकासाठी, प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक असतो. प्रत्येक दिवशीच्या समस्या, घटना वेगवेगळ्या असतात. पण दलाकडे प्रशिक्षित जवान असल्यामुळे त्या जोरावर सक्षमपणे परिस्थिती हाताळली जाते.

उंच इमारतींना लागणाऱया आगी ही मोठी समस्या आहे…

– उंच इमारतीच्या आगी ही जगभरातील समस्या आहे. मुंबईत 30 मजल्यापर्यंत पोहोचू शकेल इतकी शिडी आहे. मात्र, शिडी त्याच्या पलीकडे 50 किंवा 100 मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. उंच इमारतींच्या अंतर्गत भागातच अग्निप्रतिबंधक उपाययोजना केलेली असते. जसे, हायड्रंट सिस्टीम, व्हेट रायझर, बुस्टर पंप, स्प्रिंकल पंप, रेफुजी एरिया, ओपन स्पेस, स्टेअरकेस या सर्व फिक्स फायर इन्ट्रॉलेशनचा समावेश असतो. त्या माध्यमातून आग विझवली जाते. ही सिस्टिम मेंटेन करण्याची जबाबदारी त्या इमारतीच्या सोसायटीची असते आणि अशीच उपाययोजना करण्यावर जगभरात भर दिला जातो. त्याला दुसरा पर्याय नाही.

जगाच्या इतर शहरांच्या तुलनेत आपले अग्निशमन दल नेमके कुठे आहे? कोणत्या सुधारणा आवश्यक वाटतात?

– जगाच्या इतर शहरांच्या तुलनेत आपजगाच्या इतर शहरांच्या तुलनेत आपले अग्निशमन दल मजबूत आहे. तरीही आवश्यकतेनुसार वेळोवेळी दलाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असते. त्यानुसार अतिजोखमीच्या कामगिरीसाठी आता दलात रोबोट्सचा वापर सुरू झाला आहे. ड्रोन कॅमेरे, बाईक आणि इतर अत्याधुनिक साधने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. उंच इमारतींची आग विझविण्यासाठी काही वेळा नौदल आणि तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स मदतीसाठी उपलब्ध होतात. मात्र, कायमस्वरूपी हेलिकॉप्टरची भविष्यात गरज भासल्यास तसा प्रस्ताव पालिकेकडे मांडण्यात येईल. थोडक्यात, शहराच्या रचनेनुसार आवश्यक ते बदल आणि खबरदारी अग्निशमन दल घेत आहे.ले अग्निशमन दल मजबूत आहे. तरीही आवश्यकतेनुसार वेळोवेळी दलाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असते. त्यानुसार अतिजोखमीच्या कामगिरीसाठी आता दलात रोबोट्सचा वापर सुरू झाला आहे. ड्रोन कॅमेरे, बाईक आणि इतर अत्याधुनिक साधने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. उंच इमारतींची आग विझविण्यासाठी काही वेळा नौदल आणि तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स मदतीसाठी उपलब्ध होतात. मात्र, कायमस्वरूपी हेलिकॉप्टरची भविष्यात गरज भासल्यास तसा प्रस्ताव पालिकेकडे मांडण्यात येईल. थोडक्यात, शहराच्या रचनेनुसार आवश्यक ते बदल आणि खबरदारी अग्निशमन दल घेत आहे.

कर्मचारी, केंद्रे पुरेशी आहेत?

– सध्या अग्निशमन दलाकडे 2 हजार 764 कर्मचारी असून काही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वेक्षणानुसार, मुंबईत 50 अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या फुलफ्लेज 35 केंद्रे आहेत आणि 17 बिट केंद्रे आहेत. या दोन्हीत आपल्याला वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कर्मचाऱयाच्या सुरक्षेला आणि आरोग्याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांना सर्व प्रकारची सुरक्षेची साधने उपलब्ध व्हावीत, ही जबाबदारी खातेप्रमुख म्हणून माझी आहे.

कोरोनाच्या लढाईत अग्निशमन दलाचे योगदान मोठे आहे?

– हो, सुरुवातीला मुंबईत पहिले चार महिने सकाळ-संध्याकाळ अत्याधुनिक गाडय़ांच्या सहाय्याने रस्ते, गल्ल्या यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्ण सापडणारी घरे, मजले, इमारती आणि आजूबाजूचे रस्ते यांचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्याचे काम अग्निशमन दलाने केले आहे. मुंबईत ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण करताना अनेक जवानांना कोरोनाची लागण झाली. मात्र, दलाने आपले काम सुरूच ठेवले होते. मात्र, आता हे काम पालिका कर्मचारी करत आहेत. आम्ही आमची नियमित आणि आपत्कालीन कामे सक्षमपणे करत आहोत.