
स्वातंत्र्यदिनानिमित्त आरे दुग्ध वसाहत परिसरात युवासेना व नाता फाऊंडेशनच्यावतीने पर्यावरणपूरक स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शेणखत, गोमूत्र आणि एक बी चेंडूसारखे एकत्र करून असे शेकडो चेंडू खड्डा न करता मोकळ्या माळरानावर टाकण्यात आले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी आरे वाचवण्यासाठी व आरेतील झाडांच्या संवर्धनासाठी अनेक निर्णय घेतले. त्या पार्श्वभूमीवर, असलेल्या झाडांचे संरक्षण तसेच या क्षेत्रात अधिक झाडे निर्माण व्हावीत, यासाठी शेणखत, गोमूत्र, आणि नैसर्गिक खताचा कापर करून हा उपक्रम राबवण्यात आला. पावसाळ्यात अशा प्रकारे रुजलेल्या बियांपासून अनेक झाडे उगवतील, अशी माहिती नाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंजू शहा यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या निर्देशाचे पालन करत पर्यावरणपूरक स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. हा उपक्रम राबवल्याबद्दल युवासेना आणि नाथा फाऊंडेशन यांचे युवासेना कार्यकारी सदस्य अंकित प्रभू यांनी आभार मानले.

























































