
जम्मू कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर सज्जद उर्फ हैदर याचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत हैदर सोबत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. सकाळी याच चकमकीत एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले होते. जम्मू कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिली.
सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेइरी भागात सीआरपीएफच्या नाका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एक विशेष पोलीस अधिकारी आणि दोन सीआरपीएफ जवान असे तीन जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. मात्र त्यानंतर ते विशिष्ट भागात लपल्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसर जवानांनी घेरला व त्यानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला

























































