
मुंबईत यावर्षी झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल अडीच हजार झाडांना तडाखा बसला आहे. यामध्ये बाराशे झाडे अक्षरश: उन्मळून पडली असून 1530 झाडांच्या फांद्या तुटून कोसळल्याचे प्रकार घडले आहे. जूनपासूनच ही पडझड सुरू असून ऑगस्टमध्ये १ ते ७ ऑगस्ट या केवळ सात दिवसांत तब्बल ४८८ झाडे कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
पालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा पालिकेच्या माध्यमातून राखली जाते. तर सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागांमध्ये असणाऱ्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी संबधित मालकाची किंवा वापरकत्र्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी संबंधितांना पालिकेची परवानगी घेऊन अवास्तव वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याचे आवाहन करण्यात येते. यासाठी विभाग कार्यालयात अर्ज करता येतो किंवा नागरी सेवा विषयक 1916 क्रमांकावरही मार्गदर्शन केले जाते. ही सेवा २४ तास उपलब्ध असते. दरम्यान, यावर्षी वादळी वाNयासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. यामध्ये जूनपासून पालिकेच्या क्षेत्रात 407 तर खासगी क्षेत्रात 793 झाडे कोसळली. तर पालिका क्षेत्रात 558 तर खासगी क्षेत्रात 972 फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
पालिका क्षेत्रात सुमारे 30 लाख झाडे
वर्ष 2018 मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे 29 लाख 75 हजार 283 झाडे आहेत. यापैकी 15 लाख 63 हजार 701 झाडे खासगी आवारांमध्ये आहेत. तर 11 लाख 25 हजार 182 झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त 1 लाख 85 हजार 333 झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित 1लाख1 हजार 67 झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.






















































