येलदरी धरणाचे 10 दरवाजे पुन्हा उघडले, पूर्णा नदी पात्रात 19,630 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे या धरणाचे १० दरवाजे आज दुपारी १:५५ वाजता पुन्हा उघडण्यात आले आहेत. याआधी १७ रोजी रात्री १:१५ मिनिटाला सोडलेले १० दरवाजे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ६ दरवाजे बंद करून ४ दरवाजे सुरू ठेवण्यात आले होते. मात्र येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे येलदरी धरणात आवक वाढली आहे.

सध्या १० दरवाजामधून १६ हजार ८८० क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. सध्या १० दरवाजामधून १६ हजार ८८० क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. तर वीज निर्मिती केंद्रातून २७५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे एकूण १९६३० क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे.

यावर्षी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. तसेच या धरणाच्या वरील बाजूला असलेले खडकपूर्णा धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. हे पाणी येलदरी धरणात दाखल होत असल्यामुळे ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी धरणातून पाणी सोडावे लागणार आहे.

प्रकल्पातून पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. सध्या धरण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून, नागरिकांना या परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी परभणी यांनी येलदरी धरण १०० टक्के भरल्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या परिसरात १४४ कलम लावून संचार बंदी लागू केली होती. या कलमाची अंमलबजावणी जिंतूर पोलीस ठाण्याअंतर्गत परभणी फाळेगाव या राज्य रस्त्यावर असलेल्या अरुंद पुलाजवळ रस्ता अडवून केली जात आहे, मात्र नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत येलदरी धरणावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. येलदरी धरण दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे याठिकाणी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था केली जाते.