
मेहकर मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आज अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पीकाची पाहणी भर पावसात केली व तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
मेहकर शहर व तालुक्यात गत चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे शेतकर्यांच्या उडीद, मुग पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तर पाऊस असाच पडत राहिला तर सोयाबीन पिक सुध्दा हातचे जाण्याची भीती आहे. आज शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेनेचे जि. प. कृषी सभापती राजेंद्र पळसकर, पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव, जि. प. गटनेते आशिष रहाटे, तहसीलदार डॉ. संजय गरकळ, तालुका कृषी अधिकारी सतेंद्र चिंतलवाड, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांना सोबत घेऊन भालेगाव, पाचला, रायपूर, गवंढाळा, फरदापुर येथे थेट शेतकर्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली व तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी सभापती रमेश धोंडगे, कृषी सहाय्यक गुंजकर, तलाठी रमेश धोंडगे, झिने, रोहण बोडखे, शेतकरी हजर होते.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
मेहकर मतदार संघातील शेतकर्यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले असून नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन पाठवून केली आहे.





























































