
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आपल्या कर्मचाऱयांसाठी नवीन आरोग्य विमा योजना आणणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन असून लवकरच त्यादृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल्वेच्या 13 लाख कर्मचाऱयांना अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. सध्या रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रेल्वे कर्मचारी कल्याण आरोग्य योजना आणि केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेनूसार आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत. मात्र हा नवा प्रस्ताक मंजूर झाल्यास कर्मचाऱयांना अधिक आरोग्य सुविधा मिळू शकतील असे सूत्रांनी म्हटले आहे.
उपचार, तसेच आपत्कालिन परिस्थितीत निर्माण होणाऱया आर्थिक अडचणी सोडवता याव्यात या उद्देशानेच हा नवा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. आपल्या नव्या प्रस्तावावर रेल्वेने आपले देशभरातील सर्व झोनल रेल्वे आणि प्रोडक्शन यूनिट्सच्या महाव्यवस्थापकांकडून सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. या सर्व सूचना आणि शिफारशी प्राप्त झाल्यानंतर या प्रस्तावावर रेल्वे अंतिम निर्णय घेणार आहे.
























































