
मुंबईत कोरोनामुळे ज्येष्ठांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याने आता 50 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली तर त्यांना पालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक करण्यात आले आहे. जोपर्यंत कोरोना अहवाल निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू राहतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश येत आहे. परंतु कोरोनामुळे मृत्यू होण्याचे वृद्धांमधील प्रमाण अधिक आहे. वृद्धांमधील मृत्यू दर कमी करण्यासाठी क्वारंटाईनच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार ज्येष्ठांना कोरोना झाला तर पालिका किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे बंधनकारक करण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.
कोरोनाच्या मानवी चाचणीला आज मंजुरी
कोरोनावरील दुसर्या आणि तिसऱया टप्प्यातील चाचणी परळच्या केईएम आणि मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयाचा रुग्णालयात केली जाणार आहे. केईएममध्ये 20 ते 50 वयोगटातील 160 निरोगी व्यक्तींची तर नायरमध्ये 100 स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे. या चाचणीला शुक्रवारी राज्य सरकारची एथिकल समिती मानवी चाचणी करण्याला मंजुरी देणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.
वृद्धांचे मृत्यू रोखण्यासाठी बीसीजी लस वापरणार
मुंबईत कोरोनामुळे ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी बालकांना दिली जाणारी क्षयरोगविरोधी बीसीजी लस देण्यात येणार आहे. बीसीजी लस अनेक श्वसनविकारांपासूनही रक्षण करते. केईएम रुग्णालय आणि आरोग्य विभाग हे संशोधन करणार आहे. 60 ते 70 वयोगटातील निरोगी व्यक्ती तसेच ज्यांना एचआयव्ही किंवा कॅन्सरसारखा असाध्य रोग नसेल अशा व्यक्तींवर बीसीजीची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी 250 व्यक्तींची स्वयंसेवक म्हणून निवड केली जाणार आहे. परळ, लालबाग, शिवडी, भोईवाडा, वरळी आणि प्रभादेवी, लोअर परळ यात विभागांत ही चाचणी केली जाणार आहे.

























































