
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक मंडळ यंदा गणेशोत्सव साजरा करणार आहे. मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे 25 वे वर्ष आहे. त्यानिमित्त लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथील वाड्याची हुबेहूब प्रतिकृती ठेवली आहे.
यावर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यतिथी शताब्दी वर्ष असल्याने लोकमान्य टिळक यांचा चिखलीचा वाडा साकारण्यात आला आहे. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून प्रत्यक्ष दर्शन घेणाऱयांना आरोग्यासाठी सर्व नियम पाळण्यात येतील, गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन आम्ही हा उत्सव साजरा करणार येईल. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबीर, सॅनिटायझर, मास्क वाटप असे आरोग्याबाबत कार्यक्रम ही राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक आणि प्रमुख सल्लागार आमदार ऍड. आशीष शेलार यांनी सांगितले.
दरवर्षी आम्ही एका मंदिराची प्रतिकृती साकारतो आतापर्यंत पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, मुंबईचे सिद्धीविनायक, जेजुरीचे खंडोबा, शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिरासह, गोव्याची शांतादुर्गा, नाशिकचे काळाराम मंदिर, तूळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, ज्योतीबाचे मंदिर, गणपतीपुळय़ाचे गणपतीचे मंदिराची प्रतीकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर देवगडमधील कुणकेश्वर, संभाजीनगर येथील भूवनेश्वर आणि कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या असे मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी सांगितले.

























































