
>> शिवानी सोनार, अभिनेत्री
‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेच्या शूटिंगसाठी मी सांगलीत असते. कोरोनामुळे 17 मार्चला आम्हाला दहा दिवसांचा ब्रेक मिळाला अन् मी पुण्यातील घरी गेले. पुढे लॉकडाऊन वाढत गेला आणि 10 दिवसांचा ब्रेक तीन महिन्यांकर पोहोचला. नोव्हेंबरला मालिकेचे शुटिंग सुरू झाल्यापासून फक्त दोनच वेळाच मला पुण्यात जाता आले. लॉकडाऊनमुळे मला घरी निवांत राहता आले. छान आराम करता आला. ज्या गोष्टी चार महिन्यांत करता आल्या नाहीत त्या केल्या. मी मेहंदी आर्टिस्ट असल्याने मेहंदीची, मेकअपची प्रॅक्टिस केली. खूप गाणी ऐकली. पुस्तके वाचण्याची मला फारशी आवड नाही तरी ‘युगंधर’ आणि ‘मृत्युंजय’ कादंबरी वाचली. यादरम्यान टीव्हीवर महाभारतदेखील सुरू होते. त्यामुळे महाभारताची गोडी लागली. महाभारतातील एखादी व्यक्तिरेखा साकारायला मिळावी असे वाटतेय.
लहान भावाची दहावीची परीक्षा संपल्यामुळे आम्ही खूप धम्माल केली. भावा – बहिणीच्या नात्यापलीकडे जाऊन आमच्यात मैत्रीचे नाते आहे. अनेक गोष्टी आम्ही एकमेकांना शेयर केल्या. आईला घरकामात मदत केली. आम्ही सगळे घरात सुखरूप असलो तरी माझे बाबा पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे त्यांना रोज कामानिमित्त घराबाहेर पडावे लागायचे. त्यामुळे घरात आम्हाला विशेष काळजी घ्यावी लागायची. पुण्यातील त्यावेळची कोरोनाची परिस्थिती आम्हाला जवळून पाहायला मिळाली. परंतु काळजी घेण्याशिवाय आणि सकारात्मक विचार करण्याशिवाय आपल्या हातात काही नव्हते.
गेल्या काही वर्षांत माणुसकी हरवत चालली आहे असे आपल्याला काटायचे. मलादेखील गेल्या दीड वर्षात अनेक वाईट अनुभव आले आहेत. परंतु या काळात सगळ्यांना माणुसकीचे दर्शन घडले. माणुसकीवरचा माझा विश्वास उडता उडता राहिला. आपण नेहमी बाहेरून छान दिसण्यावर भर देतो पण आतूनदेखील आपल्या फिट राहिले पाहिजे याचे महत्त्व सगळ्यांना आता कळलेय. आता आपण जशी सर्कजण स्वतःची जशी काळजी घेतोय तशीच यापुढेदेखील घेतली पाहिजे.
नियमांचे पालन करून कामाला सुरुवात
आता पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. सांगलीला शूटिंगसाठी आलो तेव्हा आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन केले होते. सुरुवातीचे तीन महिने कुटुंबीयांसोबत होते म्हणून छान गेले. परंतु सेटवर कामाशिवायचे 14 दिवस खूप कठीण गेले. माझ्यासोबत शुभांगीताई होत्या. त्यांच्यासोबत खूप निवांत गप्पा मारल्या. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. शूटिंगला सुरुवात केली तेव्हा पहिले दोन आम्ही कलाकार एकमेकांशी बोलायलादेखील घाबरत होतो. सेटवर आता कमी लोकांमध्ये आणि खूप काळजी घेऊन आम्ही काम करतोय. हादेखील एक वेगळाच अनुभव आहे. जाता जाता सांगलीकरांचे मी खरंच कौतुक करेन; कारण इतर शहरांच्या तुलनेत इथली लोक नियमांचे तंतोतंत पालन करताना दिसतात. त्यामुळे आमचीदेखील कोरोनाबद्दलची भीती गायब झाली आहे.
























































