
हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी आयपीएलवर टीका करणाऱयांना सणसणीत चपराक वाजवली आहे. यावेळी ते म्हणाले, आयपीएलमधून मिळणाऱया पैशांकडे टीकाकार लक्ष ठेवून असतात, पण आयपीएलमधून कित्येकांना रोजगार मिळतो, त्यांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असतो याकडे अशी माणसे कानाडोळा करतात. आयपीएलमुळे ज्यांना फायदा होत नाही, अशाच व्यक्ती या स्पर्धेवर जळत असतात, असेही स्पष्ट अन् परखड मत सुनील गावसकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
आयपीएलमुळे कित्येकांचे घर चालते. आयपीएल लढतींच्या वेळी स्टेडियममध्ये क्रिकेट प्रेमींच्या चेहऱयाला रंग लावणारे, जर्सी बनवून ती स्टेडियममध्ये विकायला ठेवणारे, स्टेडियममध्ये फूड स्टॉल उभारणारे अशा असंख्य जनतेला या स्पर्धेचा आधार असतो. आयपीएलच्या आजूबाजूला हे सर्व उद्योग सुरू असतात, असेही गावसकर यावेळी आवर्जून म्हणाले.
इंटरनेटच्या सहाय्याने काही व्यक्ती प्रसिद्ध होण्यासाठी आयपीएलवर टीका करीत असतात. कारण आयपीएल ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. आम्हाला हिंदुस्थानी क्रिकेटबद्दल चिंता आहे, भल्यासाठीच आम्ही आयपीएलला विरोध करीत आहोत असे दाखवणाऱयांना वाटते. आम्ही योग्य करीत आहोत, पण प्रत्यक्षात असे काहीही नाही, असेही सुनील गावसकर पुढे सांगतात.





























































