
वीज टंचाईच्या काळात महाराष्ट्रासाठी करदान ठरणाऱया कोयना जलविद्युत केंद्राला आता वर्षभर पाण्याचे टेन्शन असणार नाही. कोयना धरण क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणी पातळी 95 टीएमसीवर गेली असून वीजनिर्मितीसाठी तब्बल 56 टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे वर्षभरासाठी कोयना वीज केंद्राची पाणीबाणी संपली आहे.
कोयना जलविद्युत केंद्राची एकूण वीज निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट आहे. राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्यास कोयना वीज केंद्रातून गरजेनुसार वीजनिर्मिती केली जाते. धरणातील एकूण पाणी साठय़ांपैकी 67 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरता येते. त्यापैकी 56 टीएमसी पाणी वीजनिर्मिती करीत उपलब्ध झाले आहे. तसेच पुढील दीड महिना पावसाचा कालावधी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार असल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत 15 ऑगस्टपासून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात होता. पण यंदा धरणातील पाणी पातळी झपाटय़ाने वाढत असल्याने 15 ऑगस्टपूर्वीच पाण्याचा विसर्ग सुरू केल्याचे कोयना वीज केंद्रच्या नियंत्रण कक्षातून सांगितले.


























































