एलईडी स्क्रीनवर आयपीएल लढतींचा धमाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलला 19 सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होणार असली तरी याप्रसंगी स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यात येणार की नाही याबाबतचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकांविना आयपीएल होणार असे गृहीत धरायला हरकत नाही. मात्र क्रिकेटप्रेमींना आयपीएलशी थेट जोडले जाण्यासाठी स्टेडियममध्ये एलईडी स्क्रीन लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेता येणार आहे. जगभरातील फुटबॉल लीगमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. आता क्रिकेटमध्येही याचा अवलंब करण्यात येणार आहे.

रोहित भिडणार धोनीला

मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्येच आयपीएलमधील सलामीची लढत होण्याची दाट शक्यता आहे. कारण चेन्नई सुपरकिंग्जच्या महेंद्रसिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने सोशल साईटवर केलेल्या मेसेजनुसार याच दोन संघांमध्ये आयपीएलची सलामीची लढत होईल अशी चर्चा रंगू लागली आहे. रोहित शर्मा या मेसेजद्वारे म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी आता निळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही, पण पिवळी जर्सी घालून तो आपला खेळ सुरूच ठेवणार आहे. भेटूया 19 सप्टेंबरला. यावरूनच सलामीच्या लढतीचे संकेत मिळाले आहेत.

या आठवडय़ात वेळापत्रक जाहीर होणार

या वर्षी आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. दरवर्षी आयपीएलचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात येते. यंदा मात्र कोरोनामुळे स्पर्धाही पुढे ढकलली अन् स्पर्धेचे ठिकाणही बदलले. त्यामुळे वेळापत्रकालाही विलंब झालाय, पण आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी या आठवडय़ात वेळापत्रक जाहीर करण्यात येईल याबाबत माहिती दिली.  

परिस्थितीचा अंदाज घेऊन

ऑस्ट्रेलिया – इंग्लंड मालिका तसेच कॅरेबियन प्रीमियर लीग या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेले खेळाडू आपापली स्पर्धा आटोपल्यानंतर यूएईला रवाना होणार आहेत. हे खेळाडू ज्या आयपीएल संघांमधून खेळणार आहेत, त्या संघांच्या लढती उशिरा खेळवायच्या याबाबत बीसीसीआयचा विचार सुरू आहे. तसेच यूएईमधील व्यवस्था, नियमांचीही पडताळणी करावी लागणार आहे. एकूणच काय तर परिस्थितीचा विचार केल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे.