चीनला बंदर देणे मोठी चूक; यापुढे ‘इंडिया फर्स्ट’ धोरण स्विकारणार – श्रीलंकेचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनशी मैत्री वाढवण्यातील धोका श्रीलंकेला समजला असून त्यांना चूक उमगली आहे. त्यामुळे हिंदुस्थानसोबतचे संबंध दृढ करण्यावर भर देणार असल्याचे श्रीलंकेने म्हटले आहे. श्रीलंका नेहमी तटस्थतेच्या धोरणाचा अवलंब करेल. मात्र, राजनैतिक, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्राबाबत ‘इंडिया फर्स्ट’ धोरण स्विकारणार असल्याचे श्रीलंकेचे परदेश सचिव जयनाथ कोलंबेज यांनी सांगितले. हिंदुस्थानशी असलेले संबंध दृढ करण्यावर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे भर देणार असल्याचे कोलंबेज यांनी सांगितले.

दोन्ही देशांनी सहकार्य वाढवत विकास करावा, हिंदुस्थानकडून श्रीलंकेला फायदाच होणार असल्याचे राष्ट्रपती राजपक्षे म्हणाले आहेत. राजनैतिक, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात श्रीलंकेचे ‘इंडिया फर्स्ट’ धोरण राहणार आहे. तर इतर देशांशी तटस्थ संबंध ठेवण्यात येणार आहेत. तसेच आर्थिक विकासासाठी इतर देशांशी संबंध विकसीत करण्यावर श्रीलंका भर देणार असल्याचे ते म्हणाले.

चीनला 99 वर्षांच्या भाडेतत्वावर हंबनटोटा बंदर देणे ही मोठी चूक असल्याचेही श्रीलंकेला उमजले आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच श्रीलंकेचे पररराष्ट्र मंत्री दिनेश गुणवर्धन यांची भेट घेतली होती. राजपक्षे सत्तेत आल्यानंतर जयशंकर यांचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. यावेळी दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला. राजपक्षे चीनच्या जास्त जवळ असल्याने हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आता श्रीलंकेने आपली चूक मान्य करत ‘इंडिया फर्स्ट’ धोरण राबवणार असल्याचे म्हटले आहे.