‘मन की बात’मधील संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खेळण्यांपासून अॅपपर्यंत स्वदेशीवर भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीवर भर दिला. खेळण्यांपासून अॅपपर्यंत प्रत्येकाने स्वदेशीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येईल, असे सांगितले. पोषण म्हणजे आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे याकडे लक्ष देणे. ‘यथा अन्नम तथा मनम्’ आपण जसे अन्न घेतो, त्याप्रमाणे आपले मन होते. म्हणजे आहारानुसार मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. त्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. देशातील अन्नधान्याची माहिती मिळण्यासाठी ‘कृषी कोष’ तयार करण्यात येणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणते धान्य पिकते, त्याचे पोषण मूल्य किती, याबाबतची सर्व माहिती दिली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मध्ये स्वदेशीवर भर दिला. लहान मुलांसाठी तयार करण्यात येणारी खेळणी स्वदेशी असावीत असे ते म्हणाले. आपण खेळण्यांवर लक्ष केंद्रीत केल्यास देश खेळणी तयार करण्याचे केंद्र बनू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी अपूर्ण असतात, तीच खरी खेळणी असतात. मुले खळेताना ती अपूर्ण खेळणी पूर्ण करतात, असे सांगत पंतप्रधानांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा दाखला दिला. आत्मविश्वासने आपल्याला देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. खेळण्याच्या बाजारपेठेकडे लक्ष दणे गरजेचे आहे. आपण पर्यावरणपूरक खेळणी तयार करायला हवी. कॉम्प्युटर गेममध्येही परदेशी थीम असण्यापेक्षा देशातीलच थीम असायला पाहिजे. आपल्या देशात अनेक कल्पना, अनेक संकल्पना आहेत, त्याचा वापर करता आला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पोलीस दल, संरक्षण क्षेत्र, आपत्कालीन पथक यात श्वानांची महत्त्वाची भूमिका असते. विविध यंत्रणाकडून श्वानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशी जातीचे अनेक चांगले श्वान आहेत. त्यांचा वापर या क्षेत्रात करण्यात यावा, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी देशी जातीच्या श्वानांची माहिती दिली. तसेच घरात पाळण्यासाठीही देशी जातीच्या श्वानांना प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. देशभरात 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. वेगाने बदलणाऱ्या काळात आणि कोरोना संकटात शिक्षकांनीही स्वतःला बदलणे गरजेचे आहे. शिक्षक या आव्हानाला सामोरे जात असून विद्यार्थ्यांच्या विकासाकडे लक्ष देत आहेत. त्यातून नव्या संकल्पना समोर येत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना संकटाच्या काळात देशातील नागरिकांनी नियमांचे पालन करत या लढ्यात सहकार्य केल्याचे सांगत त्यांनी जनतेचे आभार मानले. गर्दी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी गणेशोत्सव ऑनलाइन साजरा केला जात आहे. देशातील अनेक नागरिकांनी इकोफ्रेंडली गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. प्रत्येक नागिरक कर्तव्याचे पालन करत आहे. आता या संकटावर मात करत दैनंदिन व्यवहार सुरू करायचे असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.