सुपर आजोबा! 62व्या वाढदिवशी धावले 62.4 किमी अंतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वय हा केवळ एक आकडा आहे हे पानिपतमध्ये राहणाऱ्य़ा 62 वर्षीय आजोबांनी सिद्ध करून दाखवलेय. जसमेर सिंह संधू असे या आजोबांचे नाव असून आपल्या 62 व्या वाढदिवशी 62.4 किमी अंतर धावून त्यांनी आपल्या वाढदिवसाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून ‘आमच्यासाठी तुम्ही प्रेरणा आहात,’ अशा प्रतिक्रिया यूजर्सनी दिल्या आहेत.

जसमेर यांनी पानिपत सेक्टर 6 येथून रात्री 12 वाजता धावायला सुरुवात केली होती. करनाल येथे पोहचून ते पुन्हा पानिपतला आले. हे अंतर त्यांनी केवळ 7 तास 33 मिनिटांत पूर्ण केले आहे. 62.4 किमी अंतर कापण्यामागचे कारणही विशेष आहे. यातून आपण वयापेक्षा अधिक फिट असल्याचा संदेश त्यांनी दिलाय. गेल्या दहा वर्षांपासून जसमेर हे फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहेत. या वयातही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते कोणतीही कसर ठेवत नाही: सोशल मीडियावर त्यांनी अपलोड केलेल्या या व्हिडीओला अल्पावधीत 5 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. आपल्या फिटनेस ट्रॅकरचा स्क्रीनशॉटही त्यांनी अपलोड केलाय. या वयातही त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. ‘तुमचे डाएट आणि वर्कआऊट प्लॅन आमच्यासोबत शेअर करा,’ अशीही विनंती काहींनी त्यांना केलीय.