
ट्रॅफिक पोलिसाने चलान कापलं म्हणून एका महिलेने पोलिसावर हल्ला करून त्याची वर्दी फाडल्याचं वृत्त आहे. अखेर महिला पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतरच ती महिला शांत झाली.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या कन्नौज येथे ही घटना घडली. येथील मानीमऊ चौकीचे प्रभारी पोलीस गौरव चौधरी हे लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यासाठी वाहनांना थांबवून विचारणा करत होते. या दरम्यान कानपूरच्या दिशेकडून एक गाडी आली. त्या गाडीला पोलिसांनी अडवलं आणि गाडीत बसलेल्यांची चौकशी सुरू करण्यात आली. गाडीत एक चालक आणि एक महिला बसले होते. तसंच गाडीत बरंच सामानही होतं. चौधरी यांनी गाडी बाजूला घेऊन चलान कापण्याचा आदेश दिला.
चौधरी यांचे चलान कापण्याचे आदेश ऐकताच गाडीत बसलेल्या महिलेने पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. चौधरी यांनी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, ती गाडीच्या खाली उतरली आणि तिने चौधरी यांच्यावर हल्ला चढवला. महिलेने चौधरी यांची वर्दीही फाडली. या प्रकाराचं चित्रण करणाऱ्या एका पोलिसाचा फोनही महिलेने हिसकावला. दरम्यान, आरडाओरडा ऐकून जवळच्या पोलीस चौकीतील महिला पोलिसांनी तिला पकडलं. राग शांत झाल्यावर महिलेने फोन परत दिला आणि ती तिथून निघून गेली.
या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी चौधरी यांच्यावरच आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गाडीत फक्त दोनच जण असतानाही गाडीचं चलान कापण्याचे आदेश चौधरी यांनी दिले होते. आधी महिलेचा त्याच मुद्द्यावरून वाद झाला होता, त्याची परिणती हाणामारीत झाली, असं त्यांचं म्हणणं आहे. या महिलेच्या कृत्याचा व्हिडीओ बनवण्यात आला असून त्यानुसार तिच्यावर कारवाई होणार आहे.

























































