
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थी 15 सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेऊ शकतात. आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत 25 टक्के कोटय़ातंर्गत प्रवेश दिला जातो. या कोटय़ाच्या सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने पालकांना प्रवेश घेण्याची तारीख एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे नाव पालकांनी केवळ मेसेज वर अवलंबून न राहता पालकांनी आरटीईच्या वेबसाइटवर प्रवेशाची तारीख या लिंकवर जाऊन प्रवेशअर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख जाणून घ्यावी अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे. तसेच पालकांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठी बालकांना सोबत नेऊ नये असेही स्पष्ट केले आहे.
तर तात्पुरता प्रवेश निश्चित करा
लॉकडाऊनमुळे काही पालक व विद्यार्थी मूळ गावी अडकले असतील तर अशा पालकांनी प्रवेशासाठी शाळेशी संपर्क साधावा तसेच पाल्याची मूळ कागदपत्रे ईमेल अथवा व्हॅाट्सऍपवर पाठवून तात्पुरता प्रवेश घ्यायचा आहे. शाळेनेही प्रवेशाविषयीची माहिती पालकांनी वेळोवेळी संपर्क साधून द्यायची आहे.

























































