पंढरपुरात ‘वंचित’च्या शेकडो कार्यकर्त्यांची मंदिरावर धडक, आंबेडकरांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपुरात धडकले आणि धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भक्तांच्या भावनांचा आदर करीत दहा जणांना मंदिरात दर्शनाची परवानगी दिली. त्याचप्रमाणे आठ दिवसांत नियमावली तयार करून मंदिरे खुली केली जातील असे आश्वासन दिले. पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी या आश्वासनाची माहिती दिली व आंदोलन मागे घेतले.

वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते सोमवारी सकाळी पंढरपुरात धडकले. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, सातारा आदी भागातून आलेल्या या आंदोलकांना विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्य़ा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच रोखण्यात आले. कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडून भजन-कीर्तन सुरू केले. या आंदोलकांना पाठिंबा देत प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळांबाबत सरकारने आपली भूमिका बदलावी असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी हभप अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, अशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, विकी शेंडगे, अमित भुईगळ या दहा आंदोलकांसह मंदिरात प्रवेश करून विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले.

लोक जमले तरी कोरानाचा प्रादुर्भाव वाढत नाही

प्रकाश आंबेडकर यांना गर्दीमुळे होणाऱ्य़ा कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी विचारले असता ते म्हणाले, 85 टक्के लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचे कशाला? गर्दी जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हेच आम्हाला दाखवायचं आहे, असेही ते म्हणाले. हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, डीवायसीपी डॉ सागर कवडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी आदी ऍड आंबेडकर यांच्याशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्र्यांनी लोकभावनेचा आदर केला

मंदिर, मशीद, बुद्धविहार, गुरुद्वार आदी धार्मिक स्थळे सुरू केली जातील असे आश्वासन दिले आहे. नियमावली तयार करण्यासाठी आठ दिवस लागतील असे सांगितले आहे. पण आदेश आला नाही तर पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकभावनेचा आदर केला असून त्यांचे आम्ही आभारी आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.