
संपूर्ण देशात 22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरू करण्यास केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरुवात केली होती. जवळपास पाच महिन्यांनंतर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्याच्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जीवाचा गोवा करण्यासाठी येणार असाल तर आता तुम्हाला कोणत्याही चाचणीशिवाय गोव्यात प्रवेश मिळणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 4.0ची मार्गदर्शक तत्वे जारी करून त्याचे पालन करण्याचे निर्देश दिल होते. या नंतर गोवा सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गोव्यात प्रवेश करताना कोविड टेस्ट करून घेणे सक्तीचे होते. त्यामुळे सिंधुदुर्ग ,बेळगाव आणि कारवार मधून रोज गोव्यात नोकरी धंद्यासाठी येणाऱ्यांची ग़ैरसोय होत होती. कारवार सीमेवर दोन दिवसांपूर्वी तेथील लोकांनी आंदोलन करून मंगळवारपासून सीमा खुली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार गोव्याच्या सीमा कोणत्याही निर्बंधाशिवाय मंगळवारपासून खुल्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गोव्याच्या सीमा खुल्या होण्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकने देखील निर्बंध हटवल्याने गोव्यातील लोकही महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये बिनदिक्कत जा-ये करू शकणार आहे. गोव्यात अनलॉक मध्ये दारूची दुकाने आणि रेस्टॉरन्ट सुरु झाली होती,मात्र ‘बार’ना परवानगी देण्यात आली नसल्याने बार मालक संघटना नाराज होती.मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन बार सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती.आता नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन मंगळवारपासून बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.





























































