बीड जिल्ह्याची मान उंचावणारे शौर्य गाजवणारा भूमीपुत्र किशोर लोखंडेचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखादे मोठे काम करण्यासाठी अथवा शौर्य गाजवण्यासाठी फार मोठ्या पदवीची गरज नसते. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील सामाजिक भान जपत शौर्य गाजवून महाराष्ट्रसह जिल्ह्याची व तालुक्याची मान अभिमानाने उंचावू शकतो. तालुक्यातील उखंडा- लिंबादेवीच्या आपल्या भूमीपुत्राने महाड इमारत दुर्घटनेत सलग 40 तास जेसीबी मशीन चालवून चिमुकल्या बाळाचे प्राण वाचवले. किशोर लोखंडे यांचा गौरव तालुक्यातील उखंडा येथे करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील महाड येथे तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव कार्याला सुरुवात झाली. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. यावेळी बीड जिल्ह्यातील एक तरुण किशोर लोखंडे धावून आला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने अविश्रांत 40 तास जेसीबी मशीन चालवली. डोंगरकिन्ही जिल्हा परिषद सर्कलमधील भूमीपुत्राने जिल्ह्याची मान उंचावणारे शौर्य गाजवल्याबद्दल जिल्ह्या परिषद सदस्य प्रकाशदादा कवठेकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपुत्र किशोर याचा गौरव केला.

बाळाचं प्राण वाचल्याचा जास्त आनंद – किशोर लोखंडे
यावेळी बोलताना किशोर याने अतिशय भावपूर्ण शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला 24 तारखेच्या सायंकाळी ठेकेदाराचा अचानक फोन आला. त्यांनी दुर्घटनेची माहिती दिली. यावेळी मी जेसीबी मशीनची चावी फिरवली अन गार्डनच्या दिशेने गिअर टाकला. घटनास्थळी पोहोचताच कामाला सुरुवात केली. तब्बल 40 तासांनंतरही काम सुरूच होतं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढायचं, हे एकच ध्येय डोळ्यासमोर होतं.

ढिगाऱ्याखाली अडकेल्या माणसांना शोधण्यासाठी जेसीबी मशीन चालवत असताना पोटात गोळा येत होता. एखादा माणूस मशिनखाली तर येणार नाही ना? इमारतीखाली गाडलेल्या परंतु जिवंत असलेल्या एखाद्या माणसाला इजा तर होणार नाही ना? याची प्रचंड भीती वाटत होती. दरम्यान काळजी घेत मशिन चालवत 10 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. हे मृतदेह पाहताना जीव कासावीस होत होता. खूप वाईट वाटत होतं. ढिगाऱ्यातून निघणारे मृतदेह पाहून जीव कासावीस होत होता. खूप थकल्यासारखं वाटत होतं. दरम्यान एका 4 वर्षाच्या पोराला जिंवत बाहेर काढले. कित्येक तासापासून अविश्रांत जेसीबी चालवून थकलो होतो पण जेव्हा एक जिवंत बाळ ढिगाऱ्यातून बाहेर काढले त्यावेळी सारा शिन कुठल्याकुठे पळून गेला. पुन्हा जोमाने कामाला लागलो, अशा भावना शब्दात किशोरनं आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांनी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना किशोरने केवळ आपल्या गावाची, जिल्हा परिषद सर्कलची नव्हे तर बीड जिल्ह्याची मान उंचावली. किशोरच्या शौर्याला माझा सलाम. खूप शिकलेले, डिगऱ्या- पदव्या घेतलेले. मोठ्या पदावर असलेले लोकच शौर्य गाजवू शकतात असे नव्हे तर सर्व सामान्य कुटुंबातील एक चालक देखील महाराष्ट्राची मान उंचावणारे कर्तृत्व गाजवू शकतो. हे किशोर याने दाखवून दिले. किशोरच्या शौर्याचा केवळ डोंगरकिन्ही सर्कल नव्हे तर बीड जिल्ह्याला अभिमान असल्याचे प्रकाशदादा कवठेकर म्हणाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अनेक ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.

कवठेकरांनी दिले किशोरला पाच हजाराचे बक्षीस
बीड जिल्ह्याची शान उंचावणारे कर्तृत्व गाजवणाऱ्या किशोरला तेजस ग्रुप समूहाच्या वतीने पाच हजार रुपयांचे बक्षीस यावेळी देण्यात आले. तर आमदार सुरेश धस यांनी ही 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.