WHO च्या कोरोना लसीबाबतच्या उपक्रमात अमेरिका सहभागी होणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीचे निर्माण, विकास, उत्पादन आणि वितरणाबाबतच्या कोणत्याही जागतिक उपक्रमात सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या सर्व उपक्रमात जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) सहभागी असल्याने अमेरिका या उपक्रमांपासून दूर राहणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे अमेरिका अजूनही जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारी रोखण्यासाठी डब्लूएचओने फक्त चीन आणि काही देशांसाठीच प्रयत्न केल्याचे अमेरिकेचे म्हणणे होते. त्यावरून अमेरिकेने डब्लूएचओवर टीकाही केली होती. त्यामुळे डब्लूएचओच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

‘कोविड-19 ग्लोबल अॅक्सेस (कोवैक्स)’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी 170 पेक्षा जास्त देश चर्चा करत आहेत. लसीचे निर्माण, विकास, उत्पादन आणि वितरण सुलभ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. लसीच्या उत्पादनाला गती देत जास्त जोखीम असलेल्या देशांना लस वितरीत करुन हे संकट थोपवण्याचा विचार होत आहे. या उपक्रमाचे नेतृत्व डब्लूएचओ करत आहे. हा उपक्रम फायद्याचा असल्याचे ट्रम्प प्रशासनातील काही सदस्यांचे मत होते. तसेच जपान, जर्मनी आणि युरोपीय संघाच्या काही देशांनीही या योजनेत सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, या उपक्रमाचे नेतृत्व डब्लूएचओकडे असल्याने त्यात अमेरिका सहभागी होणार नसल्याचे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिका डब्लूएचओसोबत काम करणार नाही. ही संघटना चीनकेंद्रीत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिका डब्लूएचओच्या या उपक्रमात सहभागी होणार नाही. मात्र, कोरोनाविरोधातील लढ्यात मित्र देशांना सहकार्य करणार असल्याचे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जुड डीरे यांनी म्हटले आहे. चीनच्या प्रभावाखाली असलेल्या डब्लूएचओसोबत काम करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. हा टप्पा पूर्ण होण्याआधीच लसीला मंजुरी देण्याचा अमेरिकेचा विचार आहे. मात्र, डब्लूएचओच्या उपक्रमात सहभागी होणार नसल्याच्या निर्णयामुळे अमेरिका अजूनही डब्लूएचओवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.