
चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात गावी निघालेल्या पत्नीला पतीने संमग पुलावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 31 ऑगस्टला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. बसम्मा नागप्पा कुंभार (वय 30, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नागप्पा शिवप्पा कुंभार ( वय 37) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागप्पा मागील एका महिन्यापासून पत्नी बसम्माच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्याच्यात सतत वाद सुरू होते. भांडणामध्ये तो लहान मुलींसह पत्नीला मारहाण करीत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून बसम्मा त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात गेली होती. मात्र तिला गाडी न मिळाल्यामुळे ती पुन्हा घरी निघाली. त्यावेळी नागप्पा संगमब्रीज येथील न्यायाधीश बंगाल्याजवळ येऊन पत्नीशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने बसम्माला पुलावरून नदी पात्रात ढकलून दिले. खाली जमीनीवर पडल्यामुळे ती जखम झाली. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागप्पाला अटक केली. बसम्मावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



























































