वेब न्यूज – ड्राइव्ह इन थिएटर्सची वाढली लोकप्रियता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

कोरोनाच्या संकटाने जगभरातीलच उद्योगधंद्यांना आपल्या रोगाचा फटका दिला. अनेक उद्योग कोलमडले, अनेक अजूनही सावरायचा प्रयत्न करत आहेत तर काही अजूनही बंदच आहेत. अशाच अनेक उद्योगांपैकी एक म्हणजे चित्रपटगृहांचा व्यवसाय. एकपडदा किंवा अनेक पडदा असलेली आणि मल्टिप्लेक्स नावाने तरुणाईत लोकप्रिय असलेली चित्रपटगृहे आजही कोरोनाशी झुंजतच आहेत. या चित्रपट उद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांबरोबरच तेथे विकल्या जाणाऱया पदार्थांचा व्यवसायदेखील संकटात सापडला आहे. बंद थिएटरमध्ये गर्दी करण्याची भीती वाटणारे चित्रपटप्रेमी आता या बंद थिएटर्सच्याऐवजी मोकळ्या आकाशाखालच्या आणि मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांपेक्षा मोठा पडदा असलेल्या ड्राइव्ह इन थिएटर्सला प्राधान्य देत आहेत. अनेक ड्राइव्ह इन थिएटर्सकडे लोकांचे मागण्यांचे सतत फोन येत आहेत. एका मस्त मोठय़ा मोकळ्या मैदानावर आपली चारचाकी घेऊन जायची, गाडीतच बसून समोरच्या मस्त मोठय़ा आकाराच्या पडद्यावर चित्रपटाचा आनंद लुटायचा आणि हवे असल्यास फोनवरच पॉपकॉर्न वा अन्य खाद्यपदार्थांची ऑर्डर देऊन गाडीतच त्यांची डिलिव्हरी मिळवत चित्रपटासह त्याचा आनंद लुटायचा ही खरी ड्राइव्ह इन थिएटरची संकल्पना आहे. जगात अनेक मोठय़ा देशांत ही संकल्पना अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र आता कोरोनाच्या काळात हिंदुस्थानातदेखील तिची लोकप्रियता प्रचंड वाढीस लागली आहे. अर्थात आता पहिल्यासारखे अनेक गाडय़ांना परवानगी न देता एका गाडीत दोन लोक आणि एकूण साठ लोक म्हणजेच साधारण तीस गाडय़ा अशा हिशेबाने दर्शकांना अशा ड्राइव्ह इन थिएटर्समध्ये देशात परवानगी दिली जात आहे. येणाऱया प्रत्येक दर्शकाच्या शरीराचे तापमान मोजणे तसेच इतर सर्व वैद्यकीय नियमांचे पालन करतच या सर्व दर्शकांना आत प्रवेश दिला जात आहे. पूर्वी गाडीच्या टपावर अथवा बॉनेटवर बसून दर्शक चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकायचे, मात्र आता गाडीच्या बाहेर पडण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एकूणच मनोरंजनाची व्याख्या पूर्णपणे बदलत चालल्याची ही एक खूण म्हणावी लागेल.