ठसा – राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

अध्यात्म, विज्ञान, प्रबोधन या क्षेत्रांतील विज्ञाननिष्ठ कर्मयोगी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे 104 व्या वर्षी देहावसान झाले. एक कर्मयोगी काळाच्या पडद्याआड गेला. केवळ लातूर जिह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये त्यांचा मोठा भक्तसंप्रदाय आहे.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1917 रोजी अहमदपूर येथील प्रयागबाई व विश्वनाथ स्वामी यांच्या पोटी झाला. 1920 मध्ये मडिवाळअप्पा मठ (वीरमठ संस्थान) गुरूंच्या स्वाधीन त्यांना करण्यात आलेले होते. वारद पाठशाळा, सोलापूर येथे त्यांनी केवळ एका वर्षातच अभ्यास पूर्ण केलेला होता. प्रथमा, व्याकरण माध्यमा, काव्यतीर्थ या तिन्ही परीक्षा ते उत्तीर्ण झालेले होते. 1925 मध्ये माहेश्वरी दीक्षा मुद्रा पद्धतीने ज्ञान अवगत केले तर 1932 मध्ये वीरमठ संस्थानचे (मडियाळ मठ) उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 1938 मध्ये त्यांचा पट्टाभिषेक कार्यक्रम झाला. 1939 मध्ये काशी येथील मठामध्ये त्यांनी आपले दुसरे अनुष्ठान केले होते. 1943 मध्ये पंजाब प्रातांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य केले. 1944 मध्ये संघाचे प्रमुख गोळवलकर गुरुजी यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. 1945 मध्ये लाहोर विद्यापीठातून त्यांनी एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केलेली होती. अध्यात्म आणि धार्मिक कार्यासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही कार्य केलेले आहे. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविलेला होता. 1947 च्या स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. दोन वेळा त्यांना कारावासही भोगावा लागला होता. मराठी, संस्कृत, उर्दू, पारशी, कन्नड, पंजाबी, हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. 1948 मध्ये त्यांनी सर्व सामाजिक कार्य सोडून हिमालयात योगसाधना केली. 1953 मध्ये त्यांचे हिमालयामधून महाराष्ट्रात आगमन झाले होते. 1955 मध्ये त्यांनी शिवपाठाच्या आवृत्तीचे प्रकाशन केले आणि श्रीक्षेत्र कपिलधार येथील पदयात्रेची सुरुवात केली. 1965 मध्ये त्यांनी परमरहस्य पारायण आवृत्तीचे प्रकाशन केले. 2001 मध्ये महाराष्ट्रात मन्मथ ज्योत रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. 2004 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या कपिलधार पदयात्रेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आलेला होता. साखरखेर्डा येथे घेण्यात आलेल्या 2009 मधील अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले होते. 2011 मध्ये अहमदपूर येथील भक्तिस्थळावर त्यांचे 75 वे तपोनुष्ठान झाले. 2013 मध्ये कपिलधार विकास योजनेच्या बैठकीसही त्यांची उपस्थिती होती. 2017 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय वृद्धजन सन्मान समिती नवी दिल्ली यांचा वसुंधरारत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे अहमदपूर आणि हडोळती येथे दोन मठ आहेत. हे मठ सोडून त्यांनी आपल्या भाविकांसाठी स्वतंत्र असे भक्तिस्थळ निर्माण करण्यास सांगितले होते. त्यांचा मुक्काम नंतर भक्तिस्थळावरच होता. वृक्ष जोपासना, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्तीसाठी त्यांनी मोलाचे काम केलेले होते. लातूर जिह्यातील पहिले डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. प्रकचनांमधून त्यांनी कायम मानकतेचा, एकतेचा मार्ग दाखकला. अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्याकरण रक्षणाचा संदेश दिला. वयाची शंभरी पार केल्यानंतरही ते ज्या तडफेने मार्गदर्शन करीत होते ती ऊर्जा आश्चर्यकारक अशीच होती. अहमदपूर येथील भक्तिस्थळावर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी आता त्यांच्या भक्तगणांना दिशादर्शक ठरेल. आध्यात्मिक क्षेत्रातील एक विज्ञाननिष्ठ कर्मयोगी अशीच त्यांची ओळख कायम राहील.