हिंदुस्थानी जवानांचा चीनला दणका, सीमेवरील ‘ब्लॅक टॉप’वर ताबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुरापतखोर चीनला हिंदुस्थानी जवानांनी आणखी जोरदार दणका दिला आहे. पूर्व लडाखच्या  प्रत्यक्ष ताबा रेषेवर पँगॉग लेक परिसरातील टेकड्यांवर काही दिवसांपूर्वी नियंत्रण मिळविले होते.आता ब्लॅक टॉप परिसरावर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांनी ताबा मिळविला आहे. लष्करी रणनीतीच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कामगिरी असून चिनी सैन्याच्या हालचालींवर येथून लक्ष ठेवता येणार आहे.

पँगॉग लेक परिसरात सातत्याने चिनी सैन्याची घुसखोरी सुरू आहे. चिनी सैन्य येथून माघार घेत नाही. मात्र आता हिंदुस्थानच्या आयटीबीपी जवानांनी मोठी कामगिरी बजावली आहे.आजवर या जवानांना फिंगर 2 आणि फिंगर 3 भागाजवळच्या ‘धानसिंह पोस्ट’पर्यंतच तैनात केले जात होते मात्र आयटीबीपी जवानांचे 30 जणांचे पथक 4994 मीटर उंचीवर असलेल्या फुरचूकला पासच्या पुढे सरकले आणि ब्लॅक टॉप परिसरातील भागावर ताबा मिळविला आहे. या उंचावरील भागात आपले जवान मोठ्या संख्येने आहेत अशी माहिती आयटिबीपीचे महानिरीक्षक (ऑपरेशन) एम. एस. रावत यांनी दिली आहे.

39 वर ठिकाणी आयटीबीपीने वर्चस्व मिळविले

  • ब्लॅक टॉपसह सीमेवरील हेल्मेट टॉप, यलो बम्प या टेकड्याही ताब्यात आल्या आहेत. आयटीबीपी जवानांनी 39 वर ठिकाणांवर वर्चस्व मिळविले आहे.
  • आयटीबीपीबरोबरच लष्कर, स्पेशल फ्रंटियर फोर्सचे जवान येथे तैनात आहेत
  • चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पोस्टवर, चिनी सैन्याच्या हालचालींवर येथून हिंदुस्थानी जवानांना ‘वॉच’ ठेवता येणार आहे.

 अरुणाचल प्रदेशाच्या पाच नागरिकांचे चिनी सैन्याने केले अपहरण

सिक्कीमच्या सीमेवर रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना हिंदुस्थानी जवानांनी मदत केली.मात्र दुसरीकडे चीनच्या सैन्याचा क्रूर चेहरा समोर आला आहे.अरुणाचल प्रदेशातील पाच नागरिकांचे अपहरण चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी केले आहे. काँग्रेसचे आमदार निगॉग एरींग यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे.सीमेवरील सुबनसिरी जिल्ह्यात ही घटना घडली.सातजण जंगलात शिकारीसाठी गेले होते.तेव्हा चिनी सैनिकांनी पाचजणांचे अपहरण केले.दोन जण पळून परत येण्यास यशस्वी झाले असे एरींग यांनी दावा केला आहे.अपहरण झालेल्यांची नावेही त्यांनी ट्विटमध्ये दिली आहेत. दरम्यान, पाच महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती.