शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला चार दिवसांची एनसीबी कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर त्याचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली. त्यानंतर आज दोघांनाही किल्ला कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची एनसीबी कोठडी देण्यात आली. तर याच प्रकरणात पकडलेल्या कैजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनच्या अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीला शौविक आणि सॅम्युअल यांच्यात ड्रग्ज बाबत व्हॉट्सअप चॅट झाल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे एनसीबीने दोघांना अटक करून आज कोर्टात हजर केले.

दीपेश सावंतला अटक
सुशांत सिंह ड्रग लिंक समोर आल्यावर एनसीबीने सुशांतचा हाऊस स्टाफ दीपेश सावंतला चौकशीसाठी बोलावले होते. त्याची एनसीबीने चौकशी केल्यावर रात्री उशिरा त्याला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. एनसीबीने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे.

आणखी माहिती मिळेल, रियाचीही चौकशी होईल
शौविक आणि मिरांडाला नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. या चार दिवसाच्या कोठडीत दोघांची कसून चौकशी होईल. ड्रग्ज कनेक्शन बॉलीवूडमध्ये कुठपर्यंत पोहचलय, कोण कोण त्यात आहे त्याची माहिती दोघांकडून काढता येईल. शौविकची बहीण आणि या प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्ती हिचीदेखील चौकशी करण्यात येईल. या सर्वांना समोरासमोर बसवून विचारपूस करण्यात येईल, असे एनसीबीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.