
>> वृषाली पंढरी
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण धोरणाचा एक उद्देश हिंदुस्थानला विश्वगुरू बनवणे हा आहे. त्यासाठी आपल्या गौरवशाली गुरू-शिष्य परंपरेला अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले आहे. अर्थात हे पूर्वीसारखे जसेच्या तसे शक्य नसले तरी त्या पद्धतीतील चांगल्या गोष्टी कशा अंगिकारता येतील यावर मंथन सुरू आहे. त्यासाठी आजच्या शिक्षकांनीही काही प्रमाणात तरी गुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शिक्षक हा शब्द शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण देणाऱ्य़ास लागू होतो तर गुरू हा शब्द पारमार्थिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्य़ा व्यक्तीसाठी वापरला जातो. शाळेत किंवा महाविद्यालयात जे जे ज्ञान दिले जाते त्याला सामान्य भाषेत आपण शिक्षण म्हणतो. ते देणाऱ्य़ा शिक्षकाला त्यासाठी पगार मिळतो. विद्यार्थ्याने व्यावहारिक जगात यश संपन्न करावे हा या शिक्षणाचा हेतू असतो.
गुरू हे पैसे मिळवण्यासाठी कोणाला शिक्षण देत नसतो. विद्यार्थ्याला ज्ञान मिळावे आणि त्याचा उपयोग त्याने समाजासाठी करावा अशी गुरूची अपेक्षा असते.
शिक्षक हा जे काही शिककतो ते सरकारने, त्याच्या संस्थेने नेमून दिलेल्या चौकटीत बसावे लागते आणि त्याबाहेर जाण्याचे शिक्षकाला स्वातंत्र्य नसते. गुरूकडे मात्र अशी कुठलीही चौकट नसते. परमार्थासाठी, आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी कोणताही शासनमान्य अभ्यासक्रम नसतो. प्रत्येक विद्यार्थ्याला गुरू त्याला योग्य वाटेल असे ज्ञान देऊ शकतो. शिक्षकाकडे चांगले विषयज्ञान आणि ते विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे समजावून सांगण्याची कला असेल तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या शिकवण्याशी संबंध असायला हवाच असे काही नाही. आध्यात्मिक गुरूला मात्र ‘बोले तैसा चाले’ असेच आचरण ठेवावे लागते. त्याचे वैयक्तिक आयुष्य, चारित्र्य हे शुद्धच असावे लागते. एखादा विद्यार्थी भरकटला किंवा परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर शिक्षक त्याला जबाबदार नसतो, मात्र गुरू ही जबाबदारी स्वतःहून घेतो.
हल्लीच्या शिक्षकांची अपेक्षित कर्तव्ये पुढीप्रमाणे आहेत –
नियमित व वक्तशीरपणे शाळेत, संस्थेत उपस्थित राहणे, निर्धारित अभ्यासक्रम ठरावीक कालावधीत पूर्ण करून सर्वंकष मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती सुनिश्चित करणे, लहान मुलांच्या बाबतीत गरजेनुसार अतिरिक्त, पूरक मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांची प्रगती साध्य करणे, पालक सभा आयोजित करून त्यात पाल्यांची क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे, याशिवाय शाळेत न येणाऱ्य़ा परिसरातील मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे, गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे, सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षरता, निर्मल ग्राम योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आदी योजनांत गरजेनुसार सक्रिय सहभाग नोंदविणे, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे, बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे अशी शिक्षणाशी थेट संबंध नसलेली कामे आजच्या शिक्षकांना करावी लागतात. याशिवाय इतरही अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी अशा कामांचा बोजा कमी व्हायला हवाच, पण शिक्षकांनीही आपले आचरण नैतिक ठेवत गुरू बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.































































