खेडमध्ये 850 कोरोनाबाधित, 24 जाणांनी गमावला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसात तालुक्यात तब्बल 250 हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तरीही आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासन मात्र शांत बसून असल्याने कोरोनाला वेसण घालायची कुणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खेडमध्ये आतापर्यंत 24 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य विभागाकडून मिळलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील 850 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली आहे. या पैकी 599 जणांनी कोरोनावर यशस्वी मत केली आहे. मात्र 24 जणांना कोरोनाने आपली शिकार बनवली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खेडमध्ये आरोग्य यंत्रणा काम करत आहे मात्र दिवसागणिक वाढणारे रुग्ण आणि मृत्यू यामुळे आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न वाया जात आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी खेडमध्ये कळंबणी कोविड रुग्णालय, घरडा कोविड केअर सेंटर, दोन पेड कोविड हॉस्पिटल्स एक खासगी कोविड केअर सेंटर आहेत. कळंबणी कोविड रुग्णालयात 42 ऑक्सिजन बेड्स सुमारे 20 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. पेड कोविड हॉस्पिटल्सदेखील आवश्यक त्या सुविधांनी सज्ज आहेत मात्र तरीही खेडमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी जायचे कुठे हा प्रश्न आता कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना सतावू लागला आहे. आजच्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरपासून आजपर्यंत म्हणजे गेले सहा दिवस दरदिवशी 20 ते 25 जणांचा अहवाल पॉसिटीव्ह येत आहे. त्यामुळे या सहा दिवसात तब्बल 250 जण कोरोनाबाधित झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 850 इतकी आहे. म्हणजे येत्या चार दिवसात ही संख्या हजाराच्या घरात जाणार आहे. खेडसारख्या छोटय़ा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग इतक्या वेगाने होणे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारे आहे. त्यामुळे वायुवेगाने वाढणारा हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने  नागरिक आणि व्यापारी याना विश्वासात घेऊन कठोर पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

प्रशासनाची भूमिका आश्चर्य वाटण्यासारखी

गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यावर स्थानिक प्रशासनाने काही ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. वेळ पडल्यास तालुक्यात लॉक डाउन चा निर्णय घ्यायला हवा होता. ब्रेक द चैन यासारख्या उपाययोजना करायला  हव्या होत्या. लॉकडाऊनला विरोध झाला असता तर लॉकडाऊन करण्यामागची भूमिका समजावून सांगता आली असती. खेडच्या जनतेने ती समजूनही घेतली असती मात्र कोरोनाची संख्या वाढत असताना प्रशासनाने शांत बसून राहणे पसंत केले असल्याने प्रशासनाची भूमिका आश्चर्य वाटण्यासारखी आहे.