
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनसंबंधी रविवारी एसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची आज साडेसहा तास कसून चौकशी केली. आता सोमवारी तिला पुन्हा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. रियाला अटक होणार का? याचीच चर्चा आज दिवसभर सुरू होती. दरम्यान, याप्रकरणात शनिवारी अटक केलेल्या दीपेश सावंत याला कोर्टाने नऊ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. दीपेश सावंत हा सिंडिकेटचा सदस्य असून तो हायप्रोफाईल आणि सेलेब्रिटीजला ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने तपासचक्र सुरू करून आतापर्यंत आठ जणांना अटक केली. त्यापैकी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, झैद आणि दीपेश सावंत या चौघांना एनसीबी कोठडी मिळाली. तर कैजानला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, आज या प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्ती हिची एनसीबी कार्यालयात ड्रग्ज कनेक्शन संबंधी साडेसहा तास कसून चौकशी करण्यात आली. शौविकच्या माध्यमातून रियाने ड्रग्ज मागविल्याचे व ते सुशांतला दिल्याचे तिच्या 15 मार्चच्या व्हॉटसअप चॅटवरून निष्पन्न होत असल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, दिपेश सावंतला एनसीबीने अटक केल्यानंतर दिपेश सावंतच्या वकिलांनी एनसीबी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एनसीबीने कोणतीही पूर्व सूचना न देता दिपेशला 4 सप्टेंबरला अटक केली. त्यामुळे याप्रकरणी एनसीबी विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने याप्रकरणी जाब मागितला असल्याचे दिपेशच्या वकिलांनी सांगितले.
- दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचे एक विशेष पथक मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल झाले आहेत. या ठिकाणी सुशांतचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते.
- सीबीआयकडून सुशांतची बहीण मितू सिंहची मुंबईत चौकशी सुरू
- दीपेश सावंत हा हायप्रोफाईल आणि सेलेब्रिटीजला ड्रग्ज पुरवठा करत होता.
रिया अटक होण्यास तयार
रिया चक्रवर्ती निर्देष आहे. तिला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. तिला कदाचित अटकदेखील करण्यात येईल, पण सुशांतच्या प्रेमाखातर ती अटकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्यास तयार आहे. त्यामुळे आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नसल्याचे रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ट्विद्वारे म्हटले आहे.
RheaChakraborty is ready for arrest as it’s witch-hunt. If loving someone is a crime she’ll face consequences of her love. Being innocent she hasn’t approached any court for anticipatory bail in all cases foisted by Bihar Police with CBI, ED & NCB@SatishManeshnde
— Satish Maneshinde (@SatishManeshnde) September 6, 2020
एनसीबीने ड्रग्जचा साठा पकडला
एनसीबीच्या मुंबई झोनल युनीटने आज शहरात धडक कारकाई केली. एनसीबी पथकाने अनुज केशवाणी याला ताब्यात घेऊन हाशिश, गांजा आणि एलएसडीचा साठा तसेच रोख रक्कम जप्त केली. एनसीबीने अटक केलेल्या कैजान इब्राहिम याच्या चौकशीत अनुज केशवाणी याचे नाव समोर आले. अनुज हा ड्रग्ज सप्लायर असल्याचे कैजानकडून समोर येताच एनसीबीच्या पथकाने आज अनुजवर कारवाई केली. एनसीबीने केलेल्या छापेमारीत 590 ग्रॅम हशिश, 0.64 ग्रॅम एलएसडी शिट, 304 ग्रॅम गांजा, पावणे दोन लाख रुपये रोकड आणि पाच हजार इंडोनेशियन रुपी असा मुद्देमाल हस्तगत केला.


























































