
आवाजाकरून होणाऱ्य़ा कोरोना चाचणीसाठी पालिकेच्या गोरेगान नेस्को कोविड हेल्थ सेंटरमध्ये सॅम्पल घेण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 30 जणांच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. या पद्धतीत अवघ्या 30 सेकंदात कोरोनाचे निदान होणार आहे. इस्राईलच्या सहकार्याने होणाऱ्य़ा या देशातील पहिल्याच उपक्रमात एकूण 500 रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर होणाऱ्य़ा उपक्रमात चार महिन्यांत पालिकेला अहवाल सादर केला जाणार आहे. याच्या यशस्वीतेनंतर नियमित वापराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनाचे निदान करण्यासाठी सध्या ‘आरटी-पीसीआर’ आणि अँटिजेन चाचणी केली जात आहे. मात्र आगामी काळात अर्ध्या तासात अहवाल देणाऱ्य़ा अँटिजेन चाचणीपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाचे निदान करण्यासाठी व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स म्हणजे आवाजावरून कोरोनाचे निदान करणारी इस्रायली पद्धत वापरली जाणार आहे. इस्राईलने विकसित केलेल्या या चाचणीच्या प्रयोगासाठी मुंबई महानगर पालिकेशी करार झाला असून रुग्णांच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत आवाजाचे नमुने घेतले जात आहेत. कंपनीच्या दाव्याप्रमाणे हे मोबाईल ऍप असल्यामुळे घरात, घराबाहेर, ऑफिस, विमानतळाकर अगदी कुठेही याचा अगदी सहज वापर करता येईल. त्यामुळे रुग्णांबरोबर आरोग्य यंत्रणांचाही प्रचंड वेळ वाचेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अशी होणार कार्यवाही
नेस्कोमधील 500 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आवाजाचे नमुने इस्रायली कंपनीच्या मोबाईल ऍपचा वापर करून घेतले जातील. त्याचबरोबर या कोरोना रुग्णांचे या आधीचे आरटी-पीसीआर चाचणीद्वारे जमा केलेले नमुने, रुग्णांची सर्व माहिती, कोरोना अहवाल, एक्सरे इस्रायलमधील कंपनीला पाठवले जातील. नव्या आवाजी चाचणीतून मिळालेले निष्कर्ष आणि रुग्णांचे आधीच नमुने यांचा तुलनात्मक अभ्यास करून कंपनी पालिकेला अहवाल सादर करणार आहे.
सेरो सर्वेक्षणाचा दुसरा अहवाल लवकरच
कोरोनावर मात करून किती टक्के मुंबईकरांमध्ये कोरोनाविरोधात सामूहिक रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झाली आहे याची माहिती गोळा करण्यासाठी करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्य़ा टप्प्यातील अहवाल आठवडाभरात येणार आहे. चेंबूर, वडाळा, सायन, माटुंगा व दहिसर या भागात दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. 13 ते 28 ऑगस्ट दरम्यान झालेल्या दुसर्या टप्प्यातील सर्वेक्षणात 5,840 जणांची तपासणी करण्यात आली आहे. सेरो सर्वेक्षणाच्या दुसरा टप्पा पूर्ण झाला असून अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच दुसऱ्य़ा टप्प्यातील अहवाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबई पालिका, ‘टीआयएफआर’ आणि निती आयोग या संस्था मिळून हे सर्वेक्षण करत आहेत.



























































