तायक्वांदोमधील महाराष्ट्राची सुवर्णकन्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार सप्टेंबर हा जगामध्ये तायक्वांदो डे म्हणून साजरा करण्यात येतो. याप्रसंगी या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करीत महाराष्ट्रासह हिंदुस्थानचा झेंडा दिमाखात फडकवणाऱया मराठमोळ्या पूर्वा दीक्षित या खेळाडूशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, तायक्वांदो हा खेळ देशातील प्रत्येक महिलेने खेळायला हवा. स्वतःच्या संरक्षणासाठी हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे.

कुटुंबामधूनच खेळाचे बाळकडू

मला कुटुंबाकडून खेळाचे बाळकडू मिळाले. आई रेवती खो-खो खेळायची. त्या काळात माझ्या आईला हवा तसा सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे तिला
खो-खोमध्ये करीअर करता आले नाही. मोठा भाऊही तायक्वांदो खेळायचा. मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले. वयाच्या सहाव्या वर्षापासून तायक्वांदो खेळतेय, असे पूर्वा दीक्षित यावेळी म्हणाली.

 

सर्व बाबींकडेच लक्ष द्यावे लागते

तायक्वांदो हा इतर खेळांप्रमाणेच आहे. या खेळात करीअर करणाऱयांना आर्थिक जुळवाजुळव करावीच लागते. या खेळाची साधने, डाएट, कोच आदींवर खर्च करावा लागतो. तसेच एवढे सगळे केल्यानंतरही ऑलिम्पिकसारख्या मानाच्या स्पर्धेची पात्रता मिळवणेही कठीण असते, असे पूर्वा दीक्षित पुढे सांगते.

 

एक पाऊल फिटनेसच्या दिशेने – नामदेव शिरगावकर

सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःच्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. तायक्वांदोमुळे शारीरिक क्षमता चांगली राहते तसेच महिलांच्या स्वसंरक्षणासाठी हा खेळ महत्त्वाची भूमिका बजावतो. मुंबई, महाराष्ट्रासह देशातील प्रत्येकाने हा खेळ खेळायला हवा. या खेळाचा प्रसार व प्रचार झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला आलेखही उंचावेल असे स्पष्ट मत हिंदुस्थानी तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी यावेळी व्यक्त केले.

सुरुवातीला मजा म्हणून सहभागी झाले, पण नंतर…

मोठा भाऊ तायक्वांदो हा खेळ गांभीर्याने खेळत आहे हे पाहून मीही त्याच खेळाकडे वळले. सुरुवातीला मजा म्हणून या खेळाकडे बघितले. पहिली फाईट होत असताना माझ्या डोळ्यांमधून अश्रू आले, पण माझ्या आई-वडिलांनी मला या खेळामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलगा हा खेळ मन लावून खेळतोय, तर मग मुलीने का मागे राहावे असे त्यांना वाटत होते. 2009 साली झालेल्या राष्ट्रीय शालेय गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर मागे वळून बघितले नाही, असे पूर्वा दीक्षित पुढे आवर्जून सांगते.

 

पूर्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी

  कॉमनवेल्थ ज्युनियर चॅम्पियनशिप         2011 गोल्ड मेडल

  लुसोफोनिया गेम्स           2014   गोल्ड मेडल

  दक्षिण आशियाई गेम्स      2016   गोल्ड मेडल

  इंडिया ओपन                 2019   सिल्व्हर मेडल

  दक्षिण आशियाई गेम्स      2019   गोल्ड मेडल

…म्हणून ऑलिम्पिकमध्ये आपण मागे

हिंदुस्थानला तायक्वांदो या खेळामध्ये ऑलिम्पिक स्तरावर यश संपादन करता आलेले नाही यालाही कारण आहे. बरेच खेळाडू हिंदुस्थानातील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतात, पण मोठय़ा स्पर्धांमधील दबाव या खेळाडूंना ‘हॅण्डल’ करता येत नाही. मलाही तो दबाव जाणवतो. मात्र हे अपयश मागे टाकून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे, असा विश्वास पूर्वा दीक्षित हिने यावेळी व्यक्त केला.