मुंबई अग्निशमन दलात 25 टक्के पदे रिक्त; अधिकारी, जवानांची कमतरता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई अग्निशमन दलात अधिकारी व जवानांची 25 टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विभाग असून रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन दलातील एकूण मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त जागा याबाबत माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 25 टक्के अधिकारी व कर्मचाऱयांच्या जागा रिक्त आहेत. थेट कारवाईसाठी 14 प्रकारची 3694 पदे आहेत. त्यापैकी 2760 पदे सध्या कार्यरत आहेत, तर 934 पदे रिक्त आहेत. 159 चालक यंत्रचालकाचे पद रिक्त आहे. 69 प्रमुख अग्निशामक, 66 दुय्यम अधिकारी, 17 वरिष्ठ केंद्र अधिकारी, 10 केंद्र अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. उपमुख्य तांत्रिक अधिकारी हे पददेखील रिक्त आहे.

जवानांची 604 पदे रिक्त
सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशामकाची आहे. यात 2340 पैकी 604 पदे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त कार्यशाळेमध्ये 29 प्रकारची 125 पदे आहेत. त्यापैकी 62 पदे रिक्त आहेत आणि 66 पदावर कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबई अग्निशमन दलात कार्यशाळा ही महत्वाची असते व त्याचा अप्रत्यक्ष संबंध असतो.