
बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले असून त्यात अजून एका कलाकाराची भर पडली आहे. या अभिनेत्याचं नाव अर्जुन कपूर असं आहे. अर्जुन कपूर याने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कोरोना संक्रमित झाल्याची माहिती दिली आहे.
अर्जुनला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून तो वैद्यकीय सल्ल्यानुसार स्वत:ला घरातच क्वारंटाईन करणार आहे. हा काळ कठीण असला तरी संपूर्ण जग या विषाणूच्या हल्ल्यातून बाहेर पडेल, असा विश्वासही त्याने पोस्टमधून व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मलायकाची बहीण अमृता अरोराने याला दुजोरा दिला आहे. मलायकाच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ या शोच्या सेटवर काही दिवसांपूर्वी सात जणांना करोनाची लागण झाली होती.
24 तासांत 511 पोलिसांना बाधा
राज्यभरात गेल्या 24 तासांत 511 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत पोलिसांचा आकडा 173 वर गेला आहे. राज्यभरात 1 हजार 818 पोलीस अधिकाऱ्यांसह 15 हजार 94 पोलीस कर्मचारी असे एकूण 16 हजार 912 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तर यापैकी 1421 पोलीस अधिकारी आणि 12,298 पोलीस कर्मचारी असे एकूण 13 हजार 719 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 हजार 20 पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत यात 511 पोलिसांचीही भर पडली.

























































