
हिंदुस्थानला हायपरसोनिक तंत्रज्ञान मिळवण्यात यश आले आहे. या तंत्रज्ञानामुळे शत्रूवर ध्वनीच्या सहापट वेगाने हल्ला करणारे क्षेपणास्त्र विकसीत करता येणार आहे. ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर डीआरडीओच्या हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉनस्ट्रेटर व्हेईकलची चाचणी सोमवारी यशस्वी झाली आहे. स्वदेशी इंजिनाच्या सहाय्याने ध्वनीच्या वेगाच्या सहापट वेग गाठण्याची या वाहनाची क्षमता आहे. आगामी काळात हलके उपग्रह स्वस्तात प्रक्षेपित करण्यासाठी किंवा क्रूझ मिसाईलसाठी हायपरसोनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊ शकतो. रशिया, अमेरिका आणि चीननंतर असे तंत्रज्ञान असलेला हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे. चीनशी तणाव असतानाच हिंदुस्थानला या तंत्रज्ञानात यश मिळाले आहे.
https://youtu.be/lgsEyhzsMac
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे व्हेइकल विकसित केले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची ही चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे डीआरडीओला स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करता येणार आहे. या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्याने देशाला मोठे यश मिळाले आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. हिंदुस्थानला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हे आणखी एक पाऊल असल्याचे ते म्हणाले. डीआरडीओने आज तंत्रज्ञान मिळवले आहे. त्यामुळे आता या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पुढचा टप्पा गाठायचा आहे, असे ते म्हणाले. ही चाचणी यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.
हे तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे यश आहे. या यशस्वी चाचणीमुळे क्षेपणास्त्रे आणि इतर साधनांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग सुलभ होणार असल्याचे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान असणाऱ्या देशांच्या यादीत आता हिंदुस्थानचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. हलके उपग्रह स्वस्तात प्रक्षेपित करण्यासाठी किंवा क्रूझ मिसाईलसाठी हायपरसोनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले.

























































