
जीडीपीच्या घसरणीचे आकडे आल्यानंतर सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, केंद्र सरकार सरकारी कंपन्याचे खासगीकरण करण्याचे धोरण राबवत आहे. सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांकडे देण्यासाठी योजना आखली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. अशा प्रकारच्या खासगीकरणाची काहीही गरज नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून राहुल गांधी आक्रमक झाले असून सरकारच्या धोरणावर टीका करत आहेत. देशातील बेरोजगारी आणि कोरोना संकटावरून त्यांनी नुकतीच मोदी सरकावर टीका केली होती. आता त्यांनी सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,” नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या संकटांचा देश मुकाबला करत आहे. त्यातच आता खासगीकरणाच्या संकटाची भर पडली आहे. या खासगीकरणाची काहीही गरज नाही. आज देशातील युवकांना नोकरी हवी आहे. मात्र, खासगीकरण करून रोजगार आणि जमा झालेली राष्ट्रीय संपत्ती नष्ट करत आहे. या खासगीकरणाचा फायदा कोणाला होणार आहे. याचा फायदा नरेंद्र मोदी यांच्या खास मित्रांना होणार आहे”, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

























































