
>> दिलीप जोशी
पावसाळी वातावरणात वृत्तपत्र ‘ऑनलाइन’ वाचत असताना एका सकाळी शतायुषी संघवी सर गेल्याची बातमी काळजाचा ठोका चुकवून गेली. एकशे एक म्हणजे, वय तर झालंच होतं. पण सर कधीच कालबाहय़ झाले नव्हते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत गुजराती ‘चित्रलेखा’साठी लिखाण करीत होते. नव्वदीनंतर कॉम्प्युटर शिकून आणि फोनवरूनही लेख पाठवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले हेते आणि शंभराव्या वर्षीही एकटय़ाने विमान प्रवास करण्याची धास्ती त्यांना वाटत नव्हती.
त्यांच्या जाण्याची बातमी कळली आणि एकदम 1975 मध्ये गेलो. त्यावेळी ‘श्री’ साप्ताहिकात पत्रकार म्हणून नोकरी करत संध्याकाळच्या कॉलेजला जात होतो. एम.ए.साठी विषय होता संपूर्ण राज्यशास्त्र आणि शिक्षक होते य. दि. फडके, नगीनदास संघवी यांच्यासारखे मातब्बर. काही वेळा प्रा. राम जोशींची व्याख्यानेही असायची. या सर्व गुरुजनांनी आम्हाला बरेच काही दिले. राज्यशास्त्र शिकवताना त्यांनी आपली व्यक्तिगत राजकीय मतं आमच्यावर लादली नाहीत. पत्रकार म्हणून सर्वच राजकीय विचारधारांबाबत अलिप्तपणे विचार करायला त्यातून नकळत शिकलो. परवाच्या 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त या साऱयाची आठवण झाली ती संघवी सरांच्या दीड महिन्यापूर्वीच्या आकस्मिक जाण्याने.
संघवी सरांचा वर्ग म्हणजे चर्चासत्र असायचे. विषय शिकवताना सारे एकाग्र असायचे, पण नंतर प्रश्नोत्तरे व्हायची. तिथे विविध राजकीय मते मांडणारे महाध्यायी होतेच. त्यांचा आणि सरांचा वाद व्हायचा. प्रत्येक वेळी प्रत्येकाचे समाधान होणे अशक्यच, पण सर हसतमुखाने टीकाही सहन करायचे. म्हणायचे ‘मराठी विद्यार्थी मला खूप प्रश्न विचारतात. मतभेद तीक्रतेने व्यक्त करतात. एक शिक्षक म्हणून मला ते आवडते. कारण ती मुले स्वतंत्र विचार करतात याचेच कौतुक वाटते. मग भले, त्यातले काहीजण माझ्याशी सहमत असोत वा नसोत.’ सर तसे खऱया अर्थाने गांधीवादी. 1920 मध्ये जन्मलेल्या सरांना तरुण वयात गांधीजींसह तत्कालीन अनेक नेते पाहण्या-ऐकण्याची संधी मिळाली. तरीही पटलं नाही तिथे काँगेसवरही त्यांनी टीका केली. त्यांची टीका कधीच द्वेषमूलक नसायची. आपला मुद्दा मात्र ते हिरिरीने मांडायचे.
1975 हा आणीबाणीचा काळ. इंदिरा गांधींचे कर्तृत्व मान्य करूनही जनतेचे मूलभूत अधिकार काढून घेणारी आणीबाणी अनेकांना मान्य नव्हती. 1977 च्या वेळी विविध मान्यवर नेत्यांच्या भेटी घेऊन आणि सभांचे वृत्तांकन करण्याचे काम माझ्याकडे आले. छोटय़ा-मोठय़ा अशा सुमारे 150 सभा मी अनुभवल्या. सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांशी चर्चा केली. त्या काळात संघवी सर एकदाच भेटले. म्हणाले, ‘म्हणजे जे शिकलास त्याचा व्यवसायात उपयोग करतोयस तर!’
मध्ये बराच काळ गेलाय. सर्वच राजकीय मतमतांतरांच्या मंडळींशी स्नेह होता. पण हळूहळू मी विज्ञानक्षेत्राकडे वळलो. सर मात्र ‘चित्रलेखा’त राजकीय स्तंभ लिहित होते. त्यावेळी त्यांना तिथे पाहिले. अनेक वर्षांनी त्यांनी मला ओळखले हे विशेष. पंच्याहत्तरीतही ते तसेच सतेज होते. शुभ्र सदरा-लेंगा, चष्मा, सडपातळ शरीरयष्टी आणि वेगवान चाल. पाव शतकात त्यांच्यात काहीच फरक पडला नव्हता. ना आचारात ना विचारात.
आणखी बराच काळ लोटला. एक दिवस अचानकपणे दुपारी रेडिओच्या एका चॅनेलवर ‘सर्फिंग’ करीत असताना सरांसारखा आवाज कानावर आला. ती गुजराती मुलाखत होती. शेवटपर्यंत ऐकली. अंदाज खरा ठरला. कारण निवेदक शेवटी म्हणाला, ‘नगीनभाई तुम्ही नव्याण्णव वर्षांचे आहात, पण तुमचा उत्साह कायम आहे.’ मुलाखत संपताच गुजराती ‘चित्रलेखा’च्या पत्रकार मित्राला फोन केला. तो म्हणाला, ‘त्यांचा शताब्दी पदार्पणाचा कार्यक्रमही झाला. पण सध्या ते सुरतेला असतात. इथे आले की कळवतो.’
तो योग जुळून आला. गेल्या नोव्हेंबरात शतकपूर्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या सरांना भेटलो. मधे अनेक वर्षे गेलीच होती. तरी त्यांनी पूर्वीप्रमाणेच ओळखले. मग खूप विषयांवर मराठी, गुजराती आणि इंग्लिशमधून गप्पा झाल्या. माझे वर्गातले पहिले इंग्लिश प्रेझेंटेशन सरांमुळेच झाल्याचे आठवले. सरांना बहुतेक विद्यार्थी आठवत होते. जे आता पन्नास, साठ, सत्तर वर्षांचे होते!
बोलता बोलता सरांना म्हटले, शतायुषी जीवनाचे रहस्य काय? ते नेहमीच्या मिष्कीलपणे उद्गारले, ‘त्यात माझे काय कर्तृत्व? वय वाढतच असते. मी बहुदा एकशे दहा वर्षे जगणार!’ नव्या पिढीला विशेषतः विद्यार्थ्यांना काय सांगाल? या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, ‘अरे, आपल्यापेक्षा त्यांचे जग निराळे आहे. ती पिढी त्यानुसारच विचार करणार. विचार करणे महत्त्वाचे आणि मार्गदर्शन वगैरे म्हणशील तर गेल्या शंभर वर्षांत माझा मार्गच मला सापडलाय असे वाटत नाही. मग उपदेश कसला करणार? असे म्हणून ते खळखळून हसले.
…आणि गेल्या जुलैमध्ये अवघ्या दोन दिवसांच्या आजाराने गेले. संघवी सर स्वतः ज्ञानसमृद्ध जीवन जगलेच, पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ते संचित मागे ठेवले. कारण उत्तम प्राध्यापक, शिक्षक असूनही ते कायम ज्ञानार्थी, विद्यार्थीच राहिले. ज्या समजात शिक्षकाला प्रतिष्ठा असते तो विचारसमृद्ध असतो असे म्हटले जाते. कारण ‘स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते!’
































































