
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाणारी जलयुक्त शिवार योजना फसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. 9 हजार 644 कोटी रुपये खर्च झालेली जलयुक्त शिवार योजना अयशस्वी झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवला आहे. या योजनेमुळे भूजल पातळीत वाढ झाली नाही उलट टँकरची संख्या काढल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढला आहे.
जलयुक्त शिवार योजना ही तत्कालीन भाजप सरकारची महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेचा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रचंड गाजावाजा केला होता. पण कॅगच्या अहवालामुळे या योजनेतील फोलपणा पुढे आला आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅग अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. जलयुक्त योजनेसाठी निवडलेल्या गावांमध्ये पाणी साठवणीची तपासणी केली असता, गावआराखडय़ात कमी टीएमसी पाणी साठवणीचे नियोजन केल्याचे दिसून आले. साठवण निर्मितीतील कमतेरतेमुळे गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट सफल झाले नाही. तसेच योजनेतून केलेल्या कामांच्या देखभालीसाठी ग्रामपंचायतींनी उपकर गोळा केला नाही. राज्य सरकारनेही अनुदान दिले नाही. शेतकऱयांनी योजनेची कामे बुजवून टाकली. कामांपूर्वी शेतकऱयांची परवानगी घेतली होती, तरी कामांचे नुकसान न करण्याची हमी घेण्याची यंत्रणा नव्हती. त्यामुळे साठवण क्षमतेत घट झाली. तसेच ज्या गावात या अभियानाची अंमलबजाणी केली, त्या गावात विहीर खोदकाम आणि बोअरवेलच्या कामांत अनुक्रमे 10 आणि 9 टक्के वाढ झाल्याचा ठपका ठेवला आहे. ज्या गावात अभियान राबवले त्या गावचे 15 टक्के क्षेत्र नगदी पिकांकडे कळले. याचा अर्थ भूजलस्तर घटण्यास अटकाव करण्यासाठी सरकारने रणनिती बनवली नव्हती. तसेच गावांना आवश्यक असलेल्या पाण्याची योजनेच्या कामांतून साठवण निर्मिती कमी झाली, तरी गावे जलपूर्ण घोषित केल्यावर बोट ठेवले आहे. योजनेची 98 टक्के अंमलबजाणी झाली. मात्र 2017 मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 3 हजार 386 टँकर होते त्यांची संख्या 2019 मध्ये 67948 इतकी झाली. तर अभियानाच्यानंतर 58 टक्के गावातील भूजलपातळीत घट झाली, असा ठपकाही कॅगने ठेवला.




























































