चीनची कुरापत, 45 वर्षांत प्रथमच लडाख सीमेवर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chinese-soldiers-in-ladakh

एकीकडे चर्चेचे नाटक सुरु ठेवतानाच सीमेवर कुरघोडी करायच्या हा चीनचा डाव पुन्हा उघडकीस आला आहे. पूर्व लडाखच्या ‘एलएसी’वर पँगॉग लेक परिसरात सोमवारी रात्री हिंदुस्थानी जवानांनी हवेत गोळीबार केल्याचा कांगावा चीनने केला. मात्र हिंदुस्थानी लष्कराने आम्ही नाही तर चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीनेच हवेत गोळीबार केल्याचे स्पष्ट केले आहे.

चार दिवसांपूर्वी मास्को येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा केली होती. ‘एलएसी’वर तणाव कमी करण्यासाठी चर्चा झाली होती. सोमवारी दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर स्तरावर चर्चा झाली पण चीनने कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे तणाव कायम आहे. पँगॉग तलावाच्या दक्षिण किनाऱयाकडून हिंदुस्थानी लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा चीनने केला आहे.

– 45 वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार लडाख सीमेवर हिंदुस्थान व चीनच्या लष्करास गोळीबार करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांत चीनने या कराराचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. गलवान हिंसाचारानंतर हिंदुस्थानी लष्कराला जशास तसे उत्तर देण्याची मोकळीक देण्यात आली आहे.

चिन्यांकडे भाले, लोखंडी सळ्यांसह धारदार शस्त्र
सोमकारी चिनी लष्कराने रेजांग ला परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. चिन्यांकडे भाले, लोखंडी सळ्यांसह धारदारा शस्त्र होती. ते लडाखमधील मुखपरी आणि रेकीन ला या भागातील उंच डोंगरावर असलेल्या हिंदुस्थानी चौक्यांवर आक्रमणाच्या उद्देशानेच आले होते. मात्र हिंदुस्थानी जवानांनी त्यांना पिटाळून लावले तेव्हा चिन्यांनी हवेत 10 ते 15 राऊंड फायर केले, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

तणावातही हिंदुस्थानी जवानांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक
मोठे तणावाचे वाताकरण असताना हिंदुस्थानी जवानांनी दाखवलेल्या माणुसकी व भूतदयेचे दस्तुरखुद्द चिनी सैन्यानेही कौतुक केले आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून भरकटत हिंदुस्थानी हद्दीत चिनी शेतकऱयांचे 13 पाळीव याक आणि 4 वासरे आली होती. हिंदुस्थानी लष्कराच्या इस्टर्न कमांडच्या जवानांनी या मुक्या जनावरांना 7 सप्टेंबरला पुन्हा सुखरूप चिनी हद्दीत पाठवले.