
अमेरिकन नागरिकांना मी आवडत नाही, असे कारण देत राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणाऱया डेमोक्रॅटिक पक्षाच्या उप राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना निवडून दिल्यास तो अमेरिकेचा अपमान ठरेल, असे टीकास्त्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात बोलताना सोडले आहे.
अमेरिकन नागरिकांना मी आवडत नाहीय, असे सांगत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून पळ काढणाऱया कमला हॅरिस यांना खरे तर आता उप राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगून पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, कमला जर अमेरिकन मतदारांना पसंत नाहीत तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उप राष्ट्राध्यक्ष कशा बनू शकणार हा माझा सवाल आहे. शिवाय अमेरिकन मतदारांबाबत आधी नाराजी व्यक्त करून नंतर निवडणूक लढवणाऱया हॅरिस यांना आता निवडून दिले तर तो अमेरिकेचाच अपमान ठरेल असे माझे स्पष्ट मत आहे.
बिडेन जिंकले तर तो चीनचाच विजय ठरेल
जगात कोरोना पसरवून जगाला वेठीस धरणाऱया चीनला आणि वर्णद्वेषी कारवायांचे निमित्त करीत देशात दंगे पेटवणाऱया दंगलखोरांना माझा विजय नको आहे. माझे चीनविरुद्धचे कठोर धोरण विरोधी डेमोक्रॅटिक पक्षालाही रुचत नाहीय. त्यामुळे चीनही डेमोक्रॅटिक उमेदवार जो बिडेन राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावेत अशी मनोमन प्रार्थना करीत आहे. याचाच अर्थ बिडेन जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर तो चीनचाच विजय ठरेल, असे माझे स्पष्ट मत आहे,असे प्रतिपादनही ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक येत्या 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार आता जोरदार रंगू लागला आहे.कमला जर अमेरिकन मतदारांना पसंत नाहीत तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उप राष्ट्राध्यक्ष कशा बनू शकणार हा माझा सवाल आहे.



























































