पुण्यात टेम्पोतून अवैधरित्या 10 लाखांच्या गुटख्याची वाहतूक, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेम्पोवर अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून अवैधरित्या 10 लाखाच्या विमल पान मसाला आणि तंबाखूची वाहतूक करणार्‍या दोघांना खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून टेम्पोसह अवैध पानमसाला मिळून 12 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मंदार राजेंद्र ठोसर रा. शिवराज चौक, हडपसर आणि मनोज सुमतीलाल दुगड रा. भेकराईनगर, फुरसुंगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी अमोल पिलाणे आणि प्रमोद टिळेकर हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी फुरसुंगी परिसरातील भक्तीविहार सोसायटी परिसरात दोघेजण अवैधरित्या विमन पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती पिलाणे आणि टिळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मंदार ठोसर आणि मनोज दुगड याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरित्या विक्रीसाठी चालविलेला 10 लाखांचा विमल पानमसाला आणि तंबाखू आढळली.

अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करण्यासाठी आणि पोलिसांनी वाहनाची तपासणी करु नये, यासाठी आरोपींनी टेम्पोच्या दर्शनी भागावर अत्यावश्यक सेवा असा बोर्ड लावला होता. मात्र, पेट्रोलिंग करताना पथकातील कर्मचारी अमोल पिलाणे आणि प्रमोद टिळेकर यांच्या नजरेतून आरोपी सुटले नाही. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.