
‘कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण आदर हा दोन्हींकडून ठेवला गेला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदर ठेवलाच पाहिजे’, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज म्हणाले.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आज नवी दिल्ली येथे खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रीपद हे संवैधानिक पद आहे. त्या पदाचा आदर ठेवला. संवैधानिक पदावरील व्यक्तीबद्दल बोलल्यास लोकांना राग येणारच. त्यात सरकारचा दोष काय?’
कोणत्याही मारहाणीचे आम्ही समर्थन करत नाही पण तुम्ही वातावरण बिघडवू नका असा इशारा देतानाच, त्यामागे कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे असे संजय राऊत म्हणाले. सत्ता गेली म्हणून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे
‘महाराष्ट्राबद्दल कोणता पक्ष काय विचार करतो हे सर्वांनाच माहीत आहे. सत्ता गेली म्हणून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. एवढे उतावीळ होऊ नका. थोडा संयम ठेवा. काळ नेहमी बदलत असतो. राजकारणात सत्ता येते-जाते. लोकशाहीत सर्व स्थिर असते.’ असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
…तेव्हा राजनाथ सिंह कुठे होते?
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईतील या घटनेबद्दल माहिती घेतली होती. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी, ‘बिहारमध्ये एका कॅप्टनला घरात घुसून मारहाण झाली तेव्हा राजनाथ सिंह कुठे होते,’ असा सवाल केला. मुंबईतील प्रकारावर बोलणारे राजनाथ सिंह चीनच्या हल्ल्यावर बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
























































