
राज्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱयांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे सेवा उपलब्ध आहे. प्रवाशांना खास करून महिलांना बसने प्रवास करण्यासाठी एक दोन तास बसची वाट बघावी लागते. त्यामुळे नोकरदार महिला कर्मचाऱयांसाठी विशेष बस सेवा सुरु करण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
महानगरांमध्ये खास करून महिला कर्मचाऱयांना बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहेत. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. बसमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे.
























































